गुजरात, जळगावातून आरोपींना अटक

प्रतिनिधी / वार्ताहर, पालघर

पालघर येथील अपहरण झालेले अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद अली यांची नंतर त्यांचा खून करण्यात आल्याची उघडकीस आले आहे. याप्रकरणी पालघर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

आपल्या कंपनीत ९ मे रोजी रिक्षामधून जात असताना सातपाटी मार्गावरून धनसारकडे जाणाऱ्या कच्च्या मार्गावर एका पिकप जीप रिक्षाला आडवे येऊन अडविले. त्यानंतर मागून आलेल्या एका स्कॉर्पिओ जीपमध्ये आरोपींनी आरिफ यांना बळजबरीने रिक्षातून खेचून काढून त्यांचे अपहरण केले. यासंदर्भात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्या दिवशी सायंकाळी पालघर पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी चार तपास पथके तयार करून तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली होती.

याप्रकरणी दोन आरोपींना वापी (गुजरात) येथून तर एका आरोपीला अमळनेर (जळगाव) येथून ताब्यात घेण्यात आले असल्याचे पालघरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोपींकडे केलेल्या प्राथमिक तपासामध्ये अपहरण केलेल्या आरिफ मोहम्मद अली शेख यांचा आरोपींनी गाडीमध्ये तोंड व नाक दाबून खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे बिरवाडी परिसरात लाकडे व पेट्रोलच्या साहाय्याने शेख याचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावल्याची कबुलीदेखील आरोपीने दिली आहे.  याप्रकरणी या तिन्ही आरोपींना खून केल्याचे तसेच पुरावा नष्ट करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.

व्यावसायिक हेवेदावे 

मृत आरिफ मोहम्मद अली शेख तसेच या खुनातील मुख्य आरोपी हे कॅनबेरा कंपनीत मनुष्यबळ पुरवठा करण्याचा ठेकेदार असून त्यांच्यामध्ये व्यावसायिक कारणावरून हेवेदावे होते. या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपीची चांगले संबंध असलेली तसेच कॅनबेरा कंपनीमध्ये यापूर्वी अनेक वर्षे उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका महिलेला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. तपासात काही आढळल्यास त्यांना अटक करण्यात येईल असे योगेश चव्हाण यांनी पुढे सांगितले.