मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून पोलिसांना सहकार्य नाही; १८३ मतदारांची ओळखपत्रे जप्त

पालघर नगर परिषदेच्या मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत बोगस मतदार सहभागी झाल्याची  तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी पालघर जिल्हा पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीला तालुका मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे उघडकीस आले आहे. एकीकडे पालघर जिल्ह्यत नव्या मतदार नोंदीचा सपाटा सुरू असून यादरम्यान बोगस मतदारांची भरती होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.अशा परिस्थितीत बोगस मतदारांचा शोध घेण्यास निवडणूक विभाग सहकार्य करीत नसल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत बनावट शिधापत्रिका आधारे बोगस मतदार ओळखपत्र बनविण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने चौकशी सुरू केली आहे. याची चौकशी दरम्यान नगरपरिषद हद्दीतील १८३ मतदारांची ओळखपत्र पोलिसांनी चौकशी दरम्यान जप्त केली असून ती बोगस असल्याच्या संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी पालघरचे तहसीलदार त्यांच्याकडे या मतदारांच्या नोंदणी करताना सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची माहिती व कागदपत्रांची प्रत मिळण्याबाबत मागणी केली होती.

याबाबत जून महिन्यापासून पालघर तहसील कार्यालयाला तसेच तालुका मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे वारंवार विनंती पत्र सादर करण्यात आले असून आजवर नगरपरिषद हद्दीतील मतदार यादीची डिजिटल प्रत खेरीज इतर कोणतीही माहिती चौकशी अधिकारी यांच्याकडे देण्यात नसल्याचे समजते.

पालघरमध्ये बोगस शिधापत्रिका तयार करण्यात आल्याची तक्रार नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर दाखल करण्यात आली होती. या बोगस शिधापत्रिकांच्या आधारे बोगस मतदार कार्ड व राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर महत्त्वपूर्ण दस्तावेज तयार करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत असून याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

या पाश्र्वभूमीवर पालघर नगरपरिषदेत दाखल झालेल्या १८३ मतदारांचा नोंदणीचा तपशील, त्यांची कागदपत्र आणि निर्गमित केलेल्या अधिकारांचा तपशिल व आवश्यक माहिती पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मागितली गेली असताना याकामी पालघर तहसील कार्यालयाकडून अपेक्षित सहकार्य होत नसल्याने हा सर्व प्रकार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

नागरिकांच्या अर्जावर प्रतिसाद नाही

१५ जुलै ते ३१ ऑगस्ट यादरम्यान राज्यभरात आठ लाख नव्या मतदारांची नोंद झाली असता त्यापैकी तब्बल ५१ हजार नवीन मतदार पालघर जिल्ह्यत आहेत. असे असताना पालघर नगरपरिषद हद्दीत नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी, नावातील बदल वा राहण्याच्या ठिकाणातील बदल करण्यासाठी अनेक नागरिकांनी अर्ज केले असता त्यांच्या अपेक्षित नोंदी झाल्या नसल्याचे दिसून आले आहे. मात्र ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या अर्जाची तातडीने दखल घेत असल्याने अशा प्रकारे बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून केले जात आहे.