मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. किसन लांडगे (वय ३५) असे या शेतकऱ्याचे नाव असून दुष्काळाची झळ अधिकच बसू लागल्याने किसन हा मानसिकदृष्ट्या खचला होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दुष्काळाची भीषण झळ बसलेल्या ४५ गावांमध्ये नंदेश्वर-पडोळकरवाडी या गावाचा समावेश होतो. या गावात राहणारा किसन हा शेतकरी सततच्या दुष्काळाला कंटाळला होता. तीन दिवसांपूर्वी किसन बहिणीकडे जाऊन येतो, असे सांगून घरातून निघाला. रविवारी सकाळी त्याने नंदेश्वर येथे एका शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

लांडगे कुटुंबीय शेतीत उत्पादन निघत नसल्यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. यंदा दुष्काळाचा फटका अधिकच बसत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

दुष्काळाचा दर्जा देण्याची मागणी
मंगळवेढा तालुक्यातील ४५ गाव हे कायम कोरडवाहू क्षेत्रात मोडतात. या गावांना दुष्काळी दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी चळवळही सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर किसन लांडगेच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.

आणखी एका शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी येथे रवींद्र रामचंद्र पाटील (वय ५०) या शेतकऱ्याने दुष्काळामुळे विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतातील नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तो निराश झाला होता. त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.