शेती तर करतोय.. का करतोय? कशी करतोय? कुणासाठी करतोय तेच कळत नव्हतं. अनेक वर्षांपासून हेच चाललं होतं.. आपत्तींशी लढताना हतबलता.. वाढत्या कर्जानं कंबरडं मोडून जायचं.. पुन्हा शेतमालाला बाजारात भाव नाही. स्वत:च्या शेतात तूर पिकूनही घरच्या डाळीसाठी मिलमध्ये रांगेत लागायचं.. पण आता परिस्थिती बदलू लागली आहे.. शेतकरी गटापासून सुरू झालेला उद्योजकतेचा प्रवास आता शेतकरी कंपनीच्या वळणावर येऊन पोहचलाय.. अरविंद आनंदराव शिरभाते सांगत होते, ही वाट आहे स्वयंपूर्णतेकडे जाणारी..

शिरभाते हे अमरावती जिल्ह्य़ातील गणोजा देवी येथील श्री शारदोपासक शेतकरी स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष. गावातीलच १३ शेतकऱ्यांनी २००४ मध्ये या गटाची स्थापना केली. या भागातली बहुतांश शेती कोरडवाहू. सर्व काही निसर्गाच्या कृपेवर. तूर, कपाशी, सोयाबीन हे प्रमुख पीक. शेतमालाच्या विक्रीसाठी जवळचा बाजार अमरावतीचा. तिथे जो भाव मिळेल, त्यावर समाधान मानायचे. कधी नापिकीमुळे कमी उत्पादन झाले, तर बाजारात भाव वाढलेले, पण हाती पैसा मात्र कमीच येणार. जादा उत्पादन झाले, तर भाव पडणार.. स्थितीत सुधारणा नाहीच. एक पाय उचलायला दुसरा पाय वर काढण्याचा प्रयत्न करावा तर पहिला अजूनच खोलात जायचा, अशी गाळात अडकल्यासारखी अवस्था. तेव्हा बचतीमधून अंतर्गत कर्जवाटपाला या शेतकरी गटाने सुरुवात केली. त्यातून आधार मिळाला. पण, अजूनही काहीतरी करण्याची गटातील शेतकऱ्यांची इच्छा होती.

आपल्या भागात पिकलेली तूर ही बाजारात मिळेल त्या भावाने विकण्यापेक्षा डाळच विकली तर हाती चार पैसे अधिक येतील, हे ओळखून शारदोपासक शेतकरी गटाने तीन वर्षांपूर्वी मिनी डाळ मिल उभारली. त्यासाठी सरकारी अनुदान मिळाले. काही रक्कम शेतकऱ्यांनी जमा केली. त्यांच्या या डाळ मिलमध्ये पहिल्याच वर्षी एक लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला. शेतकरी गटाने त्यानंतर ग्रेडर, ड्रायर, पॉलिशर ही यंत्रेही खरेदी करून डाळ मिलला आधुनिकतेची जोड दिली. परिसरातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांना या डाळ मिलचा फायदा होऊ लागला. डाळ मिल गटाने चालवण्याऐवजी गटातीलच सदस्याला लिलाव प्रक्रियेतून ती चालवायला दिली जाते. यात प्रत्येक सदस्याला डाळ मिलच्या कामात दरवेळी लक्ष देण्याची गरज भासत नाही. निश्चित स्वरूपाचा नफा गटाला मिळतो.

अरविंद शिरभाते सांगतात, ‘दरमहा १०० रुपयांची बचत आम्हाला उद्योजक बनवण्यासाठी साहाय्यभूत ठरली. सुरुवातीला बचत गटातील सहकाऱ्यांना कर्जवाटप आणि नंतर डाळ मिल यातून आमचा आत्मविश्वास वाढला. आम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. सरकारी योजना आहेत, पण त्यांचा लाभ कसा मिळवावा, हे कळत नव्हतं. आम्हाला तूरडाळ तयार करण्यासाठी लांब जावं लागत होतं. त्यात वाहतुकीचा खर्चही वाढत होता. आता गावातच डाळ तयार होऊ लागली आहे. आम्ही यापुढेही जाऊन आता २० शेतकरी गट मिळून गणोजाई अ‍ॅग्रो प्रोडय़ूसर्स कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीची मोठी डाळ मिल आता उभारली जात आहे. यात ३०० शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहणार आहे.’

भातकुली तालुक्यातील नावेड या छोटय़ाशा गावातही एक डाळ मिल उभारली गेली आहे. भीमज्योती शेतकरी गटाने तीन वर्षांपूर्वी हा उद्योग सुरू केला. गटाबाहेरच्या शेतकऱ्यांकडील तुरीवर प्रक्रिया करून देण्यास त्यांनी सुरुवात केली. पंचक्रोशीतील आठ-दहा गावांमध्ये डाळ मिल नाही. प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना शेतमाल अमरावतीत नेण्यावाचून पर्याय नव्हता. गटाचे अध्यक्ष दीपक धंदर सांगतात, ‘डाळ मिलमध्ये सरासरी ३५० रुपये प्रतिक्विंटल असा प्रक्रियेवर खर्च होतो. साधारणपणे एक क्विंटल तुरीपासून ६५ किलो डाळ मिळते. आम्ही तयार केलेल्या डाळीचे स्वत:च मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग केले. तूर हाताळण्यासाठी तीन मजूर लागतात. बाकी कामे यंत्रावरच होतात. ‘आत्मा’चे अंबादास मिसाळ, कृषी पणनतज्ज्ञ गणेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनात हा उद्योग उभारण्यात आला.

महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पाचे पणनतज्ज्ञ गणेश जगदाळे सांगतात, ‘कृषी प्रक्रिया उद्योगासाठी या भागात मोठा वाव आहे. येथील उत्पादनांवर याच ठिकाणी प्रक्रिया झाल्यास त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल. समूह गटाच्या माध्यमातून उद्योजक होण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. शेतमालावर प्रक्रिया केल्यास चांगला दर मिळतो, हे शेतकऱ्यांना समजून चुकले आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अमरावती जिल्ह्य़ात १४ शेतकरी कंपन्या स्थापन झाल्या आहेत. उद्योजक म्हणून त्यांना चांगले काम करता येऊ शकेल.’

अनेक शेतकरी समूह गटांनी केवळ अंतर्गत कर्जवाटपात अडकून न राहता उद्योजकतेचा वेगळा मार्ग चोखाळला आहे. केवळ उद्योग उभारून चालणार नाही, तर उत्पादन आणि मार्केटिंगमध्ये देखील या गटांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी मोठय़ा उद्योगांवर विसंबून न राहता, उपलब्ध साधनांमधून छोटे उद्योग उभारण्याचे हे काम भागातील शेतकऱ्यांसाठी पथदर्शक ठरू लागले आहे.