नवा पक्ष काढून सौदेबाजी करायला सदाभाऊ खोत यांना व्यासपीठ मिळेल असं म्हणत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर हल्लाबोल केला. “सत्तेला कोण चिकटलं आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहित आहे. मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मी कधीही मॅनेज होत नाही. सदाभाऊ खोत यांच्यामागे एकही शेतकरी नाही,” असं म्हणत राजू शेट्टी यांना टोला लगावला.

“मी सदाभाऊ खोत यांच्याविरोधात कोणतही षड्यंत्र रचलं नाही. कडकनाथ कोंबडी प्रकरणात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सत्तेचा गैरवापर झाला म्हणून सागर खोत यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तरीही त्यांना साक्षीदार करण्यात आली. कांगावा करण्याऐवजी खोत यांनी चौकशीला सामोरं जावं,” असं शेट्टी यावेळी म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे आरोप केले. आपण कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितलं.

“सदाभाऊ आदळआपट करत आहेत. मी वैफल्यग्रस्त नाही. शेतकऱ्यांची फसवणूक ही राज्यकर्त्यांना परवडणारी नाही. आश्वासन पूर्ण न केल्यास शेतकरी सत्ताही घालवतो हेदेखील सरकारनं ध्यानात ठेवावं,” असंही त्यांनी नमूद केलं. तसंच मी खासदार होईन किंवा नाही हे येता काळच ठरवेल, असंही ते म्हणाले.

पीक विमा नाकारणं सरकारचा नाकर्तेपणा
“उस्मानाबादमध्ये दुष्काळ असतानाही सोयाबीन पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा नाकारला हा सरकारचा नाकर्तेपणा आहे,” असं राजू शेट्टी म्हणाले. “विमा कंपन्या हजारो कोटी रूपयांचा पीक विमा घेऊन नफा कमवतात आणि नफा देत नाहीत. पुरावे दिले तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याची चौकशी होणंही आवश्यक आहे,” असंही त्यांनी सांगितलं.