कापसाला हमीभाव न मिळाल्याने शासन व जिनिंग मालकाच्या कारभाराला कंटाळून कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावातील शेतकरी ईश्वर झोलबा पडवेकर यांनी स्वत:च्या कापसाचे स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची चिता पेटवून शासन, प्रशासनाच्या डोळय़ात झणझणीत अंजण घातले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आजपर्यंत अशी घटना घडली नसल्याचे बोलले जात असून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विविध समस्यांना तोंड देऊन जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांची कापसाची लागवड केली. लागवड केल्यानंतर मजुरांव्दारे पाच ते दहा रुपये किलोप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस वेचला. कापसाला चांगला भाव मिळेल, अशा आशेत शेतकरी होते. मात्र कापसाला प्रतिक्विंटल चार हजार ते साडेचार हजार रुपयांच्या वर गेला नाही. त्यामळे कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथील शेतकरी ईश्वर झोलबा पडवेकर यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन कापूस जाळण्याची परवानगी मागितली. निवेदनात म्हटले की, पणन महासंघ अल्प दरात कापूस खरेदी करत आहे. मात्र शासनाने ए ग्रेड कापूस चार हजार ५० रुपये, बी ग्रेड कापूस चार हजार ५० तर सी ग्रेड कापूस तीन हजार ६६० रुपयांचे मूल्य निर्धारित करण्यात आले होते. मात्र पणन महासंघ शेतकऱ्यांना हा दर देण्यास नकार दिला आहे. जिनिंग मालकसुध्दा दीड ते दोन हजार रुपये दराने कापूस खरेदी करीत आहे. या दराबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्यास त्यांना कापसाच्या गाडीसह जिनिंगच्या बाहेर काढण्यात येत होते. त्यामुळे या व्यवस्थेला त्रस्त होऊन कापूस जाळण्याची परवानगी पडवेकर यांनी तहसीलदार यांना निवेदनाव्दारे केली. मात्र पडवेकर यांच्या मागणीकडे गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे पडवेकर यांनी कापसू भरलेला वाहन स्मशानभूमीत नेले. स्मशानभूमीत कापसाची चिता पेटवून अंतिम संस्कार करून शासन व प्रशासनाच्या डोळय़ात झणझणीत अंजण घातले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आजपर्यंत अशी घटना घडली नसल्याचे बोलले जात असून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.