काजू उद्योगात हमखास बागायदार शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न मिळू शकते पण बोंडूवर प्रक्रिया करणारे उद्योग सिंधुदुर्गात नसल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. मात्र सिंधुदुर्गातील बोंडू गोवा राज्यात नेऊन प्रक्रिया उद्योग तेजीत सुरू आहेत.

काजू बोंडूवर प्रक्रिया करून उत्तम दर्जाचे मद्य गोवा राज्यात निर्माण केले जाते, पण महाराष्ट्र राज्यात राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे कवडीमोल भावाने बोंडू गोवा राज्यात नेण्यात येऊन प्रक्रिया केली जाते. या काजू बोंडूपासून शीतपेये निर्माण करण्याच्या घोषणा मागील दोन वर्षांपासून केल्या जात होत्या. पण राजकीय नेत्यांच्या घोषणा अधिक व काम कमीचा प्रत्यय बागायदार शेतकऱ्यांना आला आहे. राज्यात आघाडी सरकार असताना या सरकारची मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठक रत्नागिरीत झाली, तेव्हा कोकणच्या फळावर प्रक्रिया उद्योग निर्माण करणाऱ्या संस्थांना १:९ भाग भांडवल देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर काजू- बोंडू प्रक्रिया उद्योगासाठी सावंतवाडी आरोंदा- दोडामार्ग येथे सहकार संस्था निर्माण झाल्या पण सरकारच्या सहकार्याअभावी संस्था व पदाधिकारी अडचणीत आले आहेत.

काजू बी टरफल, काजू बी, बोंडू यावर प्रक्रिया करून मोठे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काजू बोंडाला हमीभावदेखील मिळू शकतो. काजू बागायतदारांना किफायतशीर आर्थिक उत्पन्नदेखील मिळू शकते. काजूगर प्रक्रिया उद्योग आहेत पण काजू बोंडू प्रक्रिया उद्योगाला सरकारने मान्यता देण्याची गरज आहे.

काजू बोंडू मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. गोवा राज्यातील उद्योजक बोंडू कवडीमोल भावाने घेऊन जातात आणि त्यापासून काडू फेणी बनवितात व काजू बोंडूचा टाकाऊ मालदेखील उपयोगात आणत आहेत. काजू बीसोबतच काजू बोंडाला प्रक्रिया उद्योगामुळे चांगला भाव मिळू शकतो.

बोंडूपासून प्रक्रिया करून सरबत, शीतपेये बनविण्याची तयारी कंपनीने दर्शविली असल्याचे सांगण्यात येत होते पण बोंडू सध्या फुकटच जात आहे. बोंडू शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करू शकतो. त्यासाठी शासनाने बोंडू प्रक्रिया उद्योगाचे धोरण आणि उत्पादनाचा निर्णय घेतला तर बागायदार शेतकरी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ शकतात.