पेणमधील शेतकऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

रायगड जिल्ह्य़ात खारभुमी विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे खारेपाट विभागातील हजारो हेक्टर शेतजमिनी नापिक होत आहेत. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
धरमतर खाडी लगतच्या परिसरात जेएसडब्ल्यू आणि पिएनपी कंपन्यांनी आपले प्रकल्प सुरु केले आहे. या प्रकल्पासाठी लोहखनिज आणि कोळसा यांची भल्यामोठय़ा बार्जेसच्या माध्यमातून वाहतूक केली जाते. बार्ज वाहतुकीमुळे बांधबंदिस्ती वारंवार फुटते त्यामुळे खारे पाणी शेतात घुसून भातपिकाचे नुकसान होते. शिवाय खाऱ्या पाण्यामुळे शेतजमीनही नापीक होते. खाडी लगतच्या परिसरात असलेल्या बाधबंदीस्तीची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही खारभूमी विकास विभागाची असते. मात्र खारभूमी विकास विभाग त्याकडे डोळेझाक करते. योग्य देखभालीअभावी बंदिस्ती फुटते आणि खाडीतील पाणी शेतात घुसते, यामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला.
पेण तालुक्यातील विविध भागातून आलेले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पेण शहरातून मोर्चाला सुरुवात झाली. तर प्रांताधिकारी कार्यालयात मोर्चाचा शेवट झाला. यावेळी प्रांताधिकारी यांना शेतकऱ्यांचा वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख विनायक पाटील, राजेंद्र

पाटील, समिता पाटील, संतोष ठाकूर आदी उपस्थित होते.
धरमतर खाडी लगतच्या परिसरात जेटीपासून कोलवे गावापर्यंत मोठी संरक्षक िभत उभारावी, पाण्याच्या नसíगक निचऱ्यासाठी उघडय़ा बांधण्यात याव्या, या परीसरात कंपन्यांनी केलेल्या भरावासाठी जी प्रदुषित माती वापरण्यात आली आहे. त्याचे परिक्षण करून अहवाल प्रसिद्ध करावा, आणि शेतीत पाणी शिरल्याने नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत वरिष्ठ स्तरावर कळवण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी प्रांताधिकारी कार्यालय प्रतिनिधीच्या वतीने देण्यात आली.