देशातले आणि राज्यातले शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. अशात या शेतकऱ्यांबाबत अभिनेत्री रविना टंडनने एक वादग्रस्त ट्विट केले आहे. ज्या ट्विटमुळे कोणाचाही संताप होईल हे उघड आहे. आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, जामीनही देऊ नका असे ट्विट अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. आंदोलन करताना शेतकरी शेतमालाची नासाडी करतात, आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते त्यामुळे तातडीने आंदोलक शेतकऱ्यांना अटक केले जावे आणि त्यांना जामीनही दिला जाऊ नये असे रविना टंडनने ट्विट करून म्हटले आहे. हा ट्विट रविना टंडनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आहे.

रविना टंडनने हा ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले. असे असले तरीही रविनाने आपली शेतकरी आंदोलन विरोधी भूमिका सोडली नाही. शेतकऱ्यांना संपावर का जावे लागते हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी जन्म घ्यावा लागतो. ज्यांना शेतीबाबत काहीही ठाऊक नाही त्यांनी आपली अक्कल पाजळू नये असे अरूण गायकवाड या नेटकऱ्याने म्हटले आहे. तर तुम्हाला महालात राहून शेतकऱ्यांची व्यथा काय कळणार? असा प्रश्न मुनीश जैन या नेटकऱ्याने विचारला आहे. तर गणेश सुरवसे या नेटकऱ्याने रविना टंडन यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. तुम्ही या लोकांसाठी शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. तुमच्या घरातले कोणी शेतकरी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. खेडेगावात येऊन बघा लोक कसे जगतात असे गणेश सुरवसे या नेटकऱ्याने सुनावले आहे.