ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी राज्यभर केलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका एस. टी. महामंडळासह खास दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्यांना बसला. पुणे विभागातून बाहेर जाणाऱ्या व मराठवाडा, विदर्भ, खान्देशमधून पुणे मार्गे कोल्हापूर, सांगली, सोलापूरकडे जाणाऱ्या बहुतेक सर्वच गाडय़ा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याचाच फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी मात्र वाहत्या गंगेत हात धुऊन घेताना प्रवाशांची यथेच्छ लूट केली. नेहमीच्या भाडय़ापेक्षा तिप्पट-चौपट दराने प्रवाशांकडून भाडेआकारणी करण्यात आली.
ऐन दिवाळीत प्रचंड मनस्ताप, मोठी आर्थिक लूट यामुळे सर्वसामान्यांच्या सुटीच्या आनंदावर आंदोलकांनी चांगलेच पाणी फेरल्याची उद्वेगजनक भावना या त्रस्त प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. आंदोलनामुळे औरंगाबादसह आसपासच्या बसस्थानकांमध्ये प्रवाशांची असणारी गर्दीही एकदम रोडावल्याचे चित्र आहे. तसेच सोमवारच्या हिंसक आंदोलनामुळे पुणे विभाग वगळता इतर सर्व विभागांत एस.टी.ची प्रवासी वाहतूक सुरळीत असली, तरी पुणे विभागात एस.टी. महामंडळाचे कोटय़वधीचे नुकसान झाले. बहुतेक गाडय़ांना आंदोलकांनी लक्ष्य केल्याने सर्व नियोजित व खास गर्दीमुळे जादा सोडण्यात येणाऱ्या बसगाडय़ा अचानक रद्द कराव्या लागल्या. परिणामी, प्रामुख्याने पुणे विभागाचे मंगळवारी सकाळी दहापर्यंत उपलब्ध माहितीनुसार १ कोटी २६ लाखांचे नुकसान झाले असल्याचे एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
आंदोलनादरम्यान पुणे विभागात एस.टी.च्या १० गाडय़ा पूर्ण जाळण्यात आल्या, तर इतर ५८ गाडय़ांचीही मोठय़ा प्रमाणात मोडतोड झाली. दरम्यान, मंगळवारी दुसऱ्या दिवशीही पुणे विभागात झालेल्या आंदोलनात १८ गाडय़ांची मोडतोड करण्यात आली. सातारा जिल्ह्य़ातील लिंब गावाजवळ(तालुका कराड) ही मोडतोड झाल्याची माहिती मिळाली.
लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीज या सणांसाठी आगाऊ बुकिंग करून ठेवलेल्या व ऐनवेळच्या प्रवाशांना एकूणच या प्रकारामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आंदोलकांनी एस.टी.ला लक्ष्य करताना प्रवाशांची मोठी कोंडी केली. दिवाळीच्या हंगामात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एस.टी. महामंडळास मोठय़ा आर्थिक उत्पन्नाची पर्वणी असते. राज्यात सर्वत्र या काळात एस.टी. बसगाडय़ांमधून ओसंडून गर्दी वाहात असते. आसनक्षमता पूर्ण होऊन उभे राहून प्रवास करणाऱ्यांमुळे एस.टी. बस खचाखच भरलेली दिसते. हे दृश्य सध्या या दिवसांत सगळीकडे पाहावयास मिळते. मोठय़ा स्थानकातून निघालेली तुडुंब भरलेली बस वाटेत अधिकृत थांब्यावर असलेल्या प्रवाशांसाठीही न थांबता पुढे नेली जात असल्याचेही सर्रास पाहावयास मिळते. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांनीही उचलला नसता तरच नवल! आधीच एस.टी.ची प्रवासी वाहतूक तुडुंब, खासगी वाहतूकदारांचीही चांदी असे चक्र गर्दीच्या काळात परिचयाचे. सोमवारच्या आंदोलनाच्या उद्रेकाचा सर्वाधिक फटका एस.टी. बसेसना बसला. खासगी वाहतूकदार मात्र सहीसलामत सुटून गेले!
एस.टी.च्या पुणे विभागाला आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसला. या विभागातून इतर ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच खासगी वाहतूकदारांनी केलेल्या आर्थिक लुटीचा फटका बसला. आंदोलनात एस.टी. बसेसना लक्ष्य केले जात असल्याने या विभागातून ये-जा करणाऱ्या सर्वच गाडय़ा ऐनवेळी बंद करण्यात आल्या. परंतु त्यामुळे मराठवाडय़ातून कोल्हापूर, सांगली, सोलापूरला जाणाऱ्या व येणाऱ्या बहुतेक प्रवाशांना मोठी झळ बसली. यातील अनेकांनी गाडय़ांचे सीट आरक्षित केले होते. गाडय़ा बंद कराव्या लागल्याने हे आरक्षण रद्द करून पैसे देण्याची तयारी महामंडळाने दर्शविली. परंतु प्रवासी पैसे परत घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. पैसे राहू द्या. पण पर्यायी व्यवस्था करा एवढेच त्यांचे म्हणणे होते.
अखेर मंगळवारी रात्री दहानंतर पोलीस बंदोबस्तात स्थानकांतून बसगाडय़ा सोडण्यास प्रारंभ झाला. तोपर्यंत खासगी वाहतूकदारांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. नेहमीच्या प्रवासी भाडय़ापेक्षा थेट तिप्पट-चौपटीने भाडे आकारून या वाहनचालकांनी प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली. आंदोलनामुळे एस.टी.ने कोल्हापूर, इंदापूरला जाणाऱ्या गाडय़ा रद्द केल्या. मराठवाडय़ातून बार्शीपर्यंत (सोलापूर) गाडय़ा नेल्या जात होत्या. महामंडळ आधीच आर्थिक अडचणीत असताना आंदोलकांच्या रेटय़ामुळे पुन्हा आर्थिक घडी विस्कटली गेल्याची प्रतिक्रिया गोरे यांनी व्यक्त केली.