News Flash

उत्पन्न नव्हे, तर उत्पादन खर्च दुप्पट

इंधन दरवाढ तसेच खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना चिंता

इंधन दरवाढ तसेच खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना चिंता

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर:  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास केंद्र सरकार बांधील असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात गेल्या काही वर्षांत वाढ होत नाही उलट उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत आहे. सध्या उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

२०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला हमीभाव दिला जाईल, उत्पादन खर्च वगळता किमान ५० टक्के हमीभाव असेल असे जाहीर केले होते. दरवर्षी हमीभाव जाहीर केले गेले मात्र हमीभावानुसार बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकावा लागला. याला अपवाद २०२१ हे वर्ष. त्यातही बाजरी, ज्वारी, मका या धान्यांना हमीभावापेक्षा कमी भावानेच बाजारपेठेत विकण्याची वेळ आली.

सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत गुंतला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करोना वेगाने पसरत असल्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच डिझेलचे भाव वाढल्याने व शेतीत बलाऐवजी ट्रक्टरचा वापर वाढल्याने नांगरणी, मोगडा मारणे, पंजी मारणे, पाळी मारणे या सगळय़ांचे भाव एकरी २०० ते २५० रुपयांनी वाढलेले आहेत. जनावरांचे बाजार बंद असल्याने बल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत त्यामुळे ट्रक्टरचे जे भाव असतील त्यानुसार शेतीची मशागत करण्यास  पर्याय नाही. रासायनिक खताच्या भावात गतवर्षीपेक्षा ३० टक्के किमती वाढल्या आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खत दुकानदारांना कंपन्या रोखीत व्यवहार करण्याचा आग्रह धरत आहेत.

बियाणाची टंचाई यावर्षी भासणार आहेच शिवाय बियाणांच्या दरातही गतवर्षीपेक्षा वाढ झाली आहे. यावर्षी सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला. त्या पार्श्वभूमीवर बियाणांच्या किमती वाढणार हे साहजिक आहे. महाबीजने किंमत न वाढवता ३० किलोच्या पिशवीची २,३५० रुपये अशी किंमत जाहीर केली आहे मात्र मागणीच्या केवळ १३ टक्के इतका कमी पुरवठा महाबीज करत असल्याने त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार नाही.

खासगी कंपन्यांच्या सोयाबीनच्या ३० किलोच्या पिशवीचे भाव ३ हजार रुपये आहेत. शंभर रुपये किलो असा सोयाबीन बियाणाचा भाव आहे. लातूर जिल्हय़ात गतवर्षीच ४ लाख १४ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. एका हेक्टरला किमान ७५ किलो बियाणे लागते. कृषी विभागामार्फत घरगुती बियाणांचा वापर करा असा आग्रह धरला गेला. बियाणांची उगवण क्षमता लक्षात घेऊन त्याचा योग्य वापर केला तरच पेरलेले उगवते. अर्थात त्यासाठी विविध निकष आहेत. यावर्षी काही प्रमाणात कृषी विभागाने उन्हाळी सोयाबीन पेरणीचे प्रयोग केले मात्र तरीही गतवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीनचा दर्जा योग्य राहिला नाही व भाव चढे होत गेल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीवर भर दिला.

खर्च वाढला

सध्या बाजारपेठेत सोयाबीन व्यतिरिक्त अन्य बियाणे उपलब्ध नाहीत. उडदाच्या ५किलो पिशवीचा भाव गतवषीं १४०० रुपये होता व मुगाचा भाव १२०० रुपये होता. यावर्षी या दोन्ही वाणाचे भाव किमान २०० ते ३०० रुपयांनी वाढतील असा अंदाज आहे. शेतीची अंतर्गत मशागत, खते, बी-बियाणे याच्या किमतीत झालेल्या वाढीबरोबर मजुरीच्या भावातही मोठी वाढ झाली आहे. कीटकनाशके, तणनाशके यांच्या भावात झालेली वाढ, शिवाय काढणीचा दरवर्षी वाढणारा खर्च यामुळे २०१४ साली जो उत्पादनाचा खर्च होता त्यात आता तब्बल दुप्पट वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली असली तरी त्यादृष्टीने फारशी पावले टाकली जात नाहीत असे चित्र आहे.

 

खताला अनुदान देण्याची गरज

यावर्षी पेट्रोलियम किमतीत झालेल्या वाढीमुळे रासायनिक खताच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने खतावरील अनुदान शेतकऱ्यांना दिले तर त्यांच्या अडचणी किमान काही प्रमाणात कमी होतील.

पाशा पटेल, माजी अध्यक्ष, कृषीमूल्य आयोग महाराष्ट्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:02 am

Web Title: farmers worried over rising fuel and fertilizer prices zws 70
Next Stories
1 ऊस गाळप हंगाम लांबला!
2 ‘तौक्ते’मुळे वीजपुरवठा यंत्रणेला फटका
3 करोनाचा गुणवंतांवरही ‘आघात’
Just Now!
X