एका रिक्षात तब्बल ११ विद्यार्थ्यांचा प्रवास; वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

वसई-विरार शहरात रिक्षांमधून शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. रिक्षात अक्षरश: कोंबून विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण केली जाते. पारनाका ते किल्लाबंदर परिसरात एका रिक्षातून चक्क ११ विद्यार्थी नेले जात असल्याचे दिसून आले आहे. वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.

परिवहन विभागाने नव्याने परवाने मंजूर केल्यानंतर मोठय़ा संख्येने रिक्षा वसईत दाखल झाल्या आहेत. मात्र काही मुजोर रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत अवैध प्रवासी वाहतूक सुरूच ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातारण पसरले आहे. अतिरिक्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी शाळकरी मुलांचा जीव धोक्यात घालून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या वाहतुकीमुळे जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत.

वसई तालुक्यात रिक्षाचालक जास्तीचे पैसे कमावण्यासाठी रिक्षा थांब्याच्या ठिकाणी प्रवासी न भरता कोणत्याही ठिकाणी रिक्षा थांबवून भरतात. परिवहन विभागाकडून फक्त तीन प्रवासी बसवून नेण्याची परवानगी आहे. मात्र रिक्षाचालक जास्तीचे प्रवासी भरून प्रवासी वाहतूक केली जात आहे, तसेच रिक्षाचालकांचा मनमानीपणाही वाढला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बेशिस्त वर्तन, हुज्जत घालणे, एक-दोन रुपयांसाठी वाद घालणे, अरेरावी करणे, दमदाटी करणे यांसारखे प्रकारही होत आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही त्यांचे बोलणे निमूटपणे सहन करावे लागत आहे.

बेकायदा वाहतुकीबरोबरच अनधिकृत रिक्षादेखील मोठय़ा प्रमाणात चालवल्या जात आहेत. एकूणच रिक्षाचालकांच्या सुरू असलेल्या कारभाराकडे वाहतूक विभागाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

रिक्षा संघटनांमार्फत रिक्षाचालकांना सूचना दिल्या जातात. संघटनेच्या बैठकीत तक्रारींची चर्चा होऊन निवारण केले जाते. रिक्षाचालकही योग्यरीत्या सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना प्रवाशांनीही सहकार्य करावे. चुकीचे वर्तन करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांना पाठीशी घालणार नाही.

– विजय खेतले, अध्यक्ष, वसई तालुका रिक्षाचालक-मालक संघटना

अवैध प्रवासी वाहतूक आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. तशा सूचनाही प्रत्येक विभागात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत; परंतु काही रिक्षाचालक पोलिसांची नजर चुकवून अवैध प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

– संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण विभाग