कर्जत (जि. अहमदनगर) येथील मोरया स्विमिंग टँकमध्ये रविवारी सांयकाळी साडेचार वाजता पोहायला शिकत असलेला रेहान जाकीर पठाण (वय १३, रा. कर्जत) हा मुलगा पाठीवर बांधलेला ड्रम अचानक सुटल्याने पाण्यात बुडून मरण पावला. त्यावेळी त्याचे वडील फोन आल्याने मोबाइलवर बोलत होते, त्यांच्या हे लवकर लक्षात आले नाही. रेहान हा त्यांचा एकलुता एक मुलगा होता.

कर्जत शहरामध्ये प्रभात नगर येथे मोरया स्विमिंग टँक आहे. येथे उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर मुले येतात. तर काही पालक मुलांना पोहण्यास शिकवण्यासाठी आणतात. रविवारी दुपारी साडेचार वाजता कर्जत येथील न्यायालयामध्ये नोकरीस असलेले जाकीर पठाण हे त्यांचा मुलगा रेहान यास पोहण्यास शिकवण्यासाठी घेऊन आले होते. त्यांनी रेहानच्या पाठीला ड्रम बांधला व त्याला पाण्यात पोहण्यास सोडले व ते काठावर थांबले. यावेळी स्विमिंग टँकमध्ये २० ते ३० मुले पोहत होती.

या वेळी जाकीर पठाण यांना फोन आला म्हणून ते गोंधळामुळे बाजूला जाऊन बोलत होते. यावेळी रेहान हा टँकमध्ये जिथे खोल पाणी आहे, तिथे पोहत गेला मात्र त्याचवेळी त्याचा पाठीवरील बांधलेला ड्रम निसटला यामुळे लगेच तो पाण्यात बुडू लागला. मात्र हे कोणाच्याच लक्षात आले नाही. फोनवरील बोलणे झाल्यावर त्याचे वडील पाण्याजवळ आले. मात्र त्यांना त्यांचा मुलगा रेहान पोहताना दिसला नाही. ते शोधून लागले, तो त्यांना कुठेच न दिसल्याने त्यांनी इतर मुलांना विचारले. अनेकांनी पाण्यात उड्या मारल्या व बुडालेला रेहान यास बाहेर काढले. त्याचे पोटातील पाणी बाहेर काढून त्याला त्वरीत रूग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. रेहान हा बार्शी येथील इयत्ता सातवीमध्ये शिकत असून सुटीत तो वडिलांकडे आला होता.