लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : माता तू न वैरिणी.. असे म्हणण्याची वेळ रविवारी ऐन मातृदिनी एका पिल्लावर आली. आई आणि तिचे पिलू आजारी असल्याने त्यांना आरोग्य उपचार केंद्रात आणले गेले. दोन दिवसानंतर प्रकृती ठीक झाली आणि उपचार केंद्रातून त्यांची रवानगी स्वगृही करण्याचा निर्णय झाला. मात्र त्या आईने पिल्लाला सोबत घेणे तर दूरच, पण त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. अखेर त्या केविलवाण्या जीवाला केंद्रात परत आणावे लागले. मातृदिनीच आईने तिच्या पिल्लाला नाकारल्याने केंद्रातील चमूच्या डोळ्यातही अश्रू तरळले.

तीन-चार दिवसांपूर्वी एक माकडीण आणि तिचे पिलू आजारी अवस्थेत सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात आणले गेले. दोन दिवसानंतर केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानी त्या दोघांच्याही सुदृढ होण्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर रविवारी मातृदिनी त्यांना निसर्गात मुक्त करण्याचा निर्णय केंद्राच्या पदाधिकाऱ्यानी घेतला. सायंकाळच्या सुमारास माकडीण व तिच्या पिल्लाला जंगलात नेले. त्यांना मुक्त करण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले. त्यावेळी माकडिणीने पिल्लाला न घेताच जंगलात धूम ठोकली. ट्रान्झिटच्या कर्मचाऱ्यानी त्या पिल्लाला माकडिणीजवळ नेण्याचा खूप प्रयत्ना केला, पण तिने त्याला स्वीकारले नाही.

शेवटी कर्मचाऱ्यांनी त्या पिल्लाला केंद्रात परत आणले. मातृदिनालाच आईविना अनाथ झालेल्या पिलाला पाहून केंद्राच्या कर्मचाऱ्याचेही डोळे पाणावले. आईविना अनाथ झालेल्या या पिल्लाची ट्रान्झिटचे कर्मचारी पोटच्या मुलासारखी काळजी घेत आहेत. ते त्या पिल्लाला आईची उणीव भासू देणार नाहीत, पण शेवटी आई ही आईच असते. त्याला आई मिळवून देण्यासाठी पुन्हा प्रयत्न करायचे का? तिने परत नेले नाही तर? ती आलीच नाही तर? असे अनेक प्रश्न ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या पथकाला पडले आहेत.