लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोग, शेतमालास दीडपट हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती ढासळली आहे. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाला आहे. तसंच रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. उपोषण सुरुच राहिलं तर किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. याशिवाय त्यांचे 3.5 किलो वजन कमी झाले आहे. अण्णांच्या प्रकृतीची वेळोवेळी डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. राळेगणसिद्धीत ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे.

सरकारी वैद्यकीय पथकानं अण्णांची तपासणी केली. अण्णांच्या यकृतातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढत आहे. बिलिरुबिन हे यकृतातील द्रव्य आहे. रक्तातील तांबड्या पेशी मृत झाल्यावर बिलिरुबिन तयार होते. उपोषण सुरूच ठेवले तर त्यांच्या किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो अशी माहिती डॉ. भारत साळवे यांनी दिली आहे.

सरकारकडून अण्णांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्यामुळे राळेगणसिद्धीच्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याविरोधात राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले, तर पारनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया अण्णांनी व्यक्त केली आहे.