गेल्या पाच वर्षांत अव्वल स्थानावर असलेले राज्य खूप मागे गेले आहे. त्यात केंद्र सरकारकडे वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) १५ हजार कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे राज्य सरकारपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून अर्थसंकल्प तयार करणे अवघड झाले आहे. विविध विकास योजनांवर त्याचा परिणाम होणार असल्याचा इशारा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

नगरपालिकेच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. तसेच विविध विकासकामांचाही शुभारंभ झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले होत्या. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मजुषा गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, कपिल पवार, निर्मला मालपाणी आदी उपस्थित होते. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपट पवार, राहीबाई पोपेरे व जहीर खान यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जहीर खान यांच्या अनुपस्थितीत त्याचे आई झकिया खान व वडील बख्तियार खान यांनी पुरस्कार स्वीकारला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी हे सरकार अल्पमुदतीचे ठरून मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकित वर्तविले असले तरी त्यात तथ्य नाही. हे सरकार आणखी किमान १५ वर्षे टिकेल असा दावा त्यांनी केला.  प्रारंभी स्वागत नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केले. प्रास्ताविक नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले. यावेळी अविनाश आदिक, राहीबाई पोपेरे, पोपट पवार, प्रणिती चव्हाण, स्नेहलता खोरे, संतोष कांबळे यांची भाषणे झाली. आभार नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार सत्तेत आले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. केंद्राकडून वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) १५ हजार कोटींचे घेणे आहे. पैसे नसल्याने कुपोषण, शिक्षण व विविध विकास योजनांसाठी पैसे कोठून येणार. विकासात अडचणी आल्या आहेत. अर्थसंकल्प कसा तयार करणार असा प्रश्न अजित पवार यांच्यासमोर आहे.

– खासदार सुप्रिया सुळे