परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे असिस्टंट विष्णू कुलकर्णी आणि इतर कर्मचाऱय़ांना दमदाटी करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडीत अण्णा मुंडे आणि इतर सहा जणांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी परळी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. या घटनेमुळे परळी शहरात तणावाचे वातावरण आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या २६ एप्रिलला होते आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंडीत अण्णा मुंडे आणि त्यांचे काही समर्थक रविवारी वैद्यनाथ कारखान्यावर गेले. तिथे त्यांनी कारखान्याचे असिस्टंट विष्णू कुलकर्णी आणि इतर कर्मचाऱयांना दमदाटी करीत कारखान्याचे रजिस्टार आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याचबरोबर कुलकर्णी यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. यानंतर रविवारी रात्री उशीरा कुलकर्णी यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पंडीत अण्णा मुंडे आणि इतर सहाजणांविरोधात तक्रार केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्याच्या ग्रामविकासमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय दबावामुळेच आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप पंडीत अण्णा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी कारखान्याचे कर्मचारी आणि पंकजा मुंडे यांच्यावरच गु्न्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.