विदर्भातील पहिल्या ‘इंटिग्रेटेड टेक्सटाईल्स पार्क’चे भूमिपूजन

कापूस बाजारातील मध्यस्थांची साखळी मोडून काढण्यासाठी शासनाने ‘टेक्सटाईल्स पार्क’ योजना सुरू केली असून यामुळे कापसाला चांगला भाव मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी रविवारी केले.

हिंगणघाटजवळच्या वणी येथील विदर्भाच्या पहिल्या ‘इंटिग्रेटेड टेक्सटाईल्स पार्क’च्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

टेक्सटाईल्स पार्कच्या माध्यमातून यापुढे उद्योजक थेट शेतकऱ्यांकडून कापूस विकत घेतील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यात कुणीही मध्यस्थी राहणार नाही. कापसाला चांगला भाव मिळेल. या योजनेच्या माध्यमातून कृषीक्षेत्रात मोठा बद्दल अपेक्षित आहे. शेतीपूरक उद्योग व मूल्यवर्धित प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मोठय़ा प्रमाणात पैसा पोहोचेल व या माध्यमातून अडीच हजारावर लोकांना रोजगार मिळेल. ‘गिमाटेक्स इंडस्ट्रीज’ने यात पुढाकार घेतल्याबद्दल मी मोहता कुटुंबीयांचे अभिनंदन करतो. उद्योग व शेतकऱ्यांमध्ये सहकार्य असेल तर नवनवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. राज्यात उत्पादित होणाऱ्या केवळ २५ टक्के कापसावर प्रक्रिया होत असून ७५ टक्के कापसावर पूरक उद्योग साखळीअभावी प्रक्रिया होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासन ‘फोर्म टू फॅ शन’ ही संकल्पना राबवित आहे. हिंगणघाटचा हाो उद्योग त्याचेच प्रत्यंतर होय. हिंगणघाटसारख्या छोटय़ा शहरात अनेक पिढय़ांपासून कापड प्रक्रिया उद्योग करणाऱ्या मोहता कुटुंबीयांनी या प्रकल्पाद्वारे नवे पर्व सुरू केले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहकार्याने आता उच्च गुणवत्तेच्या कापडाची निर्मिती होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी गिमाटेक्सचे वसंतकुमार मोहता यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमास खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, समीर कुणावार व कंपनीचे अनुरागकुमार मोहता  प्रामुख्याने उपस्थित होते.