मत्स्य प्रक्रिया उद्योगांवरील बंधने केंद्र सरकारने शिथिल केल्यामुळे मासेमारीला सुरूवात होणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य शासनाने त्या त्या जिल्ह्यतील बंदर अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार रत्नागिरीतील पॉझिटीव्ह रुग्ण सापडलेल्या राजीवडा आणि साखरतर जेटी वगळून अन्य बंदरांवरील मासेमारीला सुरुवात होणार आहे.

देशातील शेती व मत्स्य व्यवसायावरील निर्बंध केंद्र सरकारने उठवले आहेत. राज्य शासनानेही त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र मत्स्य आयुक्त राजीव जाधव यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांना दिले आहे. मासेमारी सुरु झाली तरीही त्या-त्या बंदरांवर गर्दी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यायची आहे. तसे निर्देश मच्छीमार सोसायटय़ांना देण्यात आले आहेत. मत्स्य विभागामार्फत त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

मासेमारी बंद असल्यामुळे मच्छी विक्री ठप्प होती. शासनाच्या निर्णयाचा फायदा मच्छिमारांना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यत राजीवडा आणि साखरतर येथे तीन पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.

हे दोन्ही भाग किनारी वस्तीचे असून अनेक मच्छीमार येथे वास्तव्याला आहेत. येथील लोकांना मासेमारीसाठी मुभा दिली तर त्यातून गोंधळ उडू शकतो, म्हणून पोलिस प्रशासनाकडून या भागात निर्बंध घालण्यात आले आहेत. याठिकाणी छोटय़ा-मोठय़ा सुमारे दोनशे मच्छीमारी नौका आहेत. त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. अन्य बंदरांमधील मासेमारी व्यवसाय सुरु करण्यात येणार असला तरीही या दोन गावांना वगळण्यात आले आहे.

याबाबत सहाय्यक मत्स्य आयुक्त व्ही. एम. भादुले म्हणाले की, आता मोठय़ा प्रमाणात मासेमारी व्यवसाय सुरु होणार आहे. यामध्ये बंदरांवर गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मिरकरवाडा, हर्णे यासह बंदरांच्या ठिकाणी मत्स्य विभागासह जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

वीज पडून एकाचा मृत्यू

तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथील संतोष गंगाराम झूजम (वय ४० वर्षे) यांचा  मंगळवारी संध्याकाळी  वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष एका रोपवाटिकेत कामाला होते. तेथून संध्याकाळी घरी परत जाताना  पाऊस आल्याने ते एका झाडाखाली थांबले होते. याच वेळी वीज अंगावर पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू ओढवला.