येथील बालगृहातून शनिवारी मध्यरात्री पाच अल्पवयीन मुलींनी पलायन केले. या सर्व मुली बालकल्याण समितीमार्फत डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अ‍ॅण्ड आफ्टरकेअर असोसिएशन संस्थेच्या बालगृहात दाखल झाल्या होत्या. कोतवाली पोलिसांनी गुन्हय़ाची नोंद केली आहे. सर्व मुली १५ ते १७ वयोगटांतील आहेत. या संदर्भात संस्थेने एका काळजीवाहक रक्षिकेला निलंबित केले आहे.
संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचही मुली जिल्हय़ातील विविध भागांतील आहेत. त्या प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेल्या होत्या. पोलिसांनी शोध घेऊन त्यांना बालकल्याण समितीमार्फत संस्थेत १ ते २ महिन्यांपूर्वी दाखल केले होते. या पाच जणींसह अशाच प्रकारातील एकूण ७ मुलींना स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आलेले होते. त्यांच्यावर काळजीवाहक रेखा घनश्याम वर्मा यांची रात्रपाळीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. पाच मुलींनी बाहेरील एका मुलीची मदत घेऊन, झोपी गेलेल्या रेखा वर्मा यांच्या उशीखालील कोठडीच्या कुलपाखालील किल्ली घेतली. आधी कोठडीचे व नंतर बाहेरील गेटचे कुलूप उघडून त्यांनी पलायन केले. कोठडीतील अन्य दोघींना साडेतीनच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. त्यांच्या आरडाओरडीमुळे इतरांना कळाली. वर्मा यांच्या रात्रपाळीच्या वेळेस यापूर्वीही मुलींनी पलायन केल्याच्या घटना घडल्या होत्या, त्या वेळी त्यांना समज देण्यात आली होती. परंतु पुन्हा अशी घटना घडल्याने त्यांना संस्थेने निलंबित केले.

ंसुरक्षेचा प्रश्न : संस्थेच्या बालगृहातून तीन महिन्यांपूर्वी सहा अल्पवयीन मुलांनी पलायन केल्याची घटना घडली होती. त्यातील एक सनी शरद शिंदे या दलित युवकाची प्रेमप्रकरणातून दोन महिन्यांपूर्वी पाटोदा (बीड) येथे नेऊन हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. संस्थेने सुरक्षेसाठी मोठय़ा उंच भिंतींचे कुंपण उभारले आहे, मात्र तरीही अशा पलायनाच्या घटना थांबलेल्या नाहीत.