दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीस शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री पाठलाग करून पकडले. झडतीत त्यांच्याकडे दोन चाकू, मिरची पावडर, विविध कंपन्यांचे १८ मोबाईल असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
रेल्वेस्थानक परिसरात अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटण्यासाठी ही टोळी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. जालाननगर भागातील अमृत संकुलाजवळ रेल्वेस्थानक भिंतीलगत ही टोळी पोलिसांना आढळून आली. सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, हवालदार मच्छिंद्र ससाणे, रावसाहेब जोंधळे, नितीन मोरे आदींनी टोळीला घेरले. मात्र, टोळीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. क्रांती कांतीलाल भोसले (वय २५, लालमाती, भावसिंगपुरा), रमेश भगवान शिंदे (वय २५, राजीवनगर), गोलू दगडू काळे (वय ५०, राजीवनगर), संजू गोलू काळे (वय २०, भावसिंगपुरा) व जितेंद्रकुमार अवधेशप्रसाद यादव (वय २०, भावसिंगपुरा) अशी त्यांची नावे आहेत.
दीड लाख ऐवजासह दोघे ताब्यात
अन्य एका कारवाईत चोरीच्या गुन्ह्य़ातील दोघा फरारी आरोपींना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले. छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नंदनवन कॉलनी परिसरात पोलिसांची गस्त सुरू होती. रात्री साडेअकराच्या सुमारास दोन तरुण एमएच २० बीएक्स २६२२ या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून कपडय़ात काहीतरी लपवून जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी हटकले असता ते अडखळत उत्तरे देऊ लागले. त्यांच्याजवळील गाठोडय़ात चोरलेले तीन टीव्ही संच होते. ते विकण्यासाठी हे तरुण घेऊन जात होते. राहुल सतीश बोटकर (वय २४) व स्वप्नील अशोक पाटील (वय २३, दोघेही नंदनवन कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत. मोटरसायकल, चोरलेले टीव्ही असा १ लाख ५५ हजारांचा ऐवज क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतला.