18 November 2017

News Flash

विदर्भात भर ‘पूर’

अतिवृष्टीमुळे वर्धानजीकच्या सिंदी रेल्वे आणि तुळजापूर दरम्यान रेल्वे रुळाखालील माती आणि खडी वाहून गेल्याने

प्रतिनिधी, अमरावती / वर्धा | Updated: July 21, 2013 1:02 AM

अतिवृष्टीमुळे वर्धानजीकच्या सिंदी रेल्वे आणि तुळजापूर दरम्यान रेल्वे रुळाखालील माती आणि खडी वाहून गेल्याने विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक शनिवारीही पूर्वपदावर येऊ शकली नाही. मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेगाडय़ा भुसावळमार्गे वळवण्यात आल्या, तर नागपूरहून सुटणाऱ्या दोन पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे अभियंत्यांकडून हा मार्ग दुरुस्त करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
पावसामुळे सिंदी रेल्वे आणि तुळजापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालील माती आणि खडी वाहून गेली. ही बाब लक्षात येताच चेन्नई-निझामुद्दिन एक्स्प्रेस वर्धा येथेच थांबवून ठेवण्यात आली. त्यानंतर येणारी त्रिवेंद्रम-नवी दिल्ली केरळ एक्स्प्रेस, चेन्नई-निझामुद्दिन दुरांतो एक्स्प्रेससह अनेक गाडय़ा बडनेरा-भुसावळ मार्गे वळवण्यात आल्या. या मार्गावरून धावणाऱ्या सुमारे ७४ रेल्वेगाडय़ांना अतिवृष्टीचा फटका बसला.
दरम्यान, शनिवारी ११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, ५१२८६ नागपूर-भुसावळ पॅसेंजर आणि ५१२६० नागपूर-वर्धा पॅसेंजर रद्द करण्यात आली, तर १२८७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्स्प्रेस भुसावळमार्गे वळवण्यात आली.
मुंबई, अहमदाबाद, पुण्याहून दुपापर्यंत नागपूरला पोहोचणाऱ्या सर्व गाडय़ा भुसावळमार्गे वळवण्यात आल्याने अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे उतरणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसही भुसावळमार्गे वळवण्यात आली. नागपूरहून पश्चिम विदर्भात येणाऱ्या दोन्ही पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे अभियंत्यांची चमू घटनास्थळी असून शक्य तितक्या लवकर हा मार्ग मोकळा करण्याची धावपळ सुरू आहे.
चंद्रपूरला पावसाचा तडाखा
विक्रमी पावसाचा फटका वीज व कोळसा उत्पादन क्षेत्रालाही बसला असून, वीज केंद्रातून केवळ २५० मेगाव्ॉट वीजनिर्मिती होत आहे, तर वेकोलिच्या अकरा खाणी पाण्याने तुडूंब भरल्याने कोळसा उत्पादनही ठप्प झाले आहे. याचा फटका राज्याला बसण्याची शक्यता आहे.  शुक्रवारी दुपारी १२ ते ४ या काळात या शहरात, तसेच जिल्हय़ात २८१ मि.मी. पाऊस कोसळला. गेल्या २५ वर्षांंच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा पाऊस झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले होते. पावसामुळे झालेल्या हानीची आकडेवारी समोर येत असून वीज व कोळसा उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. २३४० मेगाव्ॉट निर्मिती क्षमता असलेल्या येथील महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला कालच्या पावसाने अक्षरश: पंगू करून टाकले आहे. पावसाळ्यात कोळशाची प्रतवारी खराब राहात असल्याने आधीच या केंद्राला टय़ुब लिकेजचे ग्रहण लागले होते. या केंद्रातील अनेक संचात पाणी शिरल्याने काल सायंकाळपर्यंत केंद्रातील वीजनिर्मिती ७५० मेगाव्ॉटवर आली होती. या केंद्राच्या कोळसा हाताळणी केंद्रात शनिवारी पाणी शिरल्याने केवळ दोन संच सुरू असून, त्यातून फक्त २५० मेगाव्ॉट वीजनिर्मिती होत असल्याची माहिती केंद्राचे मुख्य अभियंता बुरडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. कोळसा हाताळणी केंद्रात पाणी शिरल्याने शिल्लक असलेला कोळशाचा साठा पूर्णपणे ओला झाला असून या केंद्रातील पाणी बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  या केंद्राला पाणी देणाऱ्या इरई धरणाचे सातही दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाबाहेर पडलेले हे पाणी केंद्राच्या वसाहतीत शिरले असून अनेक निवासस्थाने जलमय
झाली.

First Published on July 21, 2013 1:02 am

Web Title: flood flush vidhrbha