लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने चारा छावणी सुरू करण्यात येत असून त्याच्या ताडपत्री शेडचे भूमिपूजन तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते करण्यात आले.
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांचे पशुधन सांभाळण्यासाठी ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थानने पुढाकार घेतल्याबद्दल संजय वारकड यांनी समाधान व्यक्त करून चारा छावणीसाठी जिल्हा प्रशासन, लातूर बाजार समिती, पशुसंवर्धन व कृषी विभाग यांचे सहकार्य मिळत आहे, असे म्हटले. साफसफाईसाठी महापालिकेचे सहकार्य मिळत असल्याचे विक्रम गोजमगुंडे यांनी सांगितले. पंडित जाधव, आर. टी. मोरे यांनी चारा छावणीमुळे बळीराजाला दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी आपले पशुधन चारा छावणीत आणून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, सचिव ज्ञानोबा गोपे, रमेशसिंह बिसेन व देवस्थानच्या विश्वस्तांनी केले. देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, सचिव ज्ञानोबा गोपे, रमेशसिंह बिसेन, यशवंत भोसले, उपविभागीय मंडल अधिकारी पंडित जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. मोरे, तालुका कृषी अधिकारी के. व्ही. पाटील, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. राजकुमार पडीले, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. जाधव, मंडल अधिकारी श्रावण उगीले, तलाठी एम. एस. हिप्परगेकर यांची उपस्थिती होती.