अवैध लाकूड तस्करीला पायबंद घालण्याऐवजी अशा गरप्रकाराला अप्रत्यक्ष सहकार्य केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जे. कोटुरवार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. औरंगाबादच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जारी केलेले निलंबनाचे आदेश मंगळवारी येथे धडकल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणात वनरक्षक पी. आर. जाधव यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, माहूर आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात जंगल आहे. एकेकाळी नक्षलवाद्यांचा भाग म्हणून हे तालुके प्रसिद्ध होते. घनदाट जंगल हळूहळू ओस पडू लागले. लाकडाची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याच्या तक्रारी होत्या. लाकडाची अवैध तस्करी थांबवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वन विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. उपवनसंरक्षक डोडल यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात लातूर तस्करीला आळा बसला होता. विदर्भ व आंध्र सीमेवर असलेल्या या भागातून अवैधरीत्या लाकूड तस्करी होऊ नये, यासाठी एकीकडे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत असताना दुसरीकडे काही अधिकारी मात्र त्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत आहेत.
गेल्या १५ डिसेंबरला अप्पाराव पेठ परिसरातून लाकूड नेणारी मालमोटार यवतमाळ जिल्ह्यातील िपपळकुटी वन विभागाच्या तपासणी नाक्यावर अडवण्यात आली. या गाडीत मोठय़ा प्रमाणात गरीचे लाकूड होते. तेथील अधिकाऱ्यांनी वाहतुकीचा परवाना मागितला. संबंधितांनी परवाना दाखवला खरा, पण तो बनावट असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाने पोलिसांना माहिती दिली. पांढरकवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसरीकडे वन विभागाने स्वतंत्र चौकशी सुरू केली. प्रथमदर्शनी वनरक्षक के. आर. जाधव दोषी आढळल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच आठवडय़ात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अप्पाराव पेठ विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जे. कोटुरवार हे सकृतदर्शनी दोषी असल्याने तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला. प्रथमदर्शनी कोटुरवार दोषी आढळल्यानंतर औरंगाबादच्या वरिष्ठ वनसंरक्षक कार्यालयाने त्यांच्यावर मंगळवारी निलंबनाचे आदेश जारी केले.
लाकूड तस्करीला अप्रत्यक्ष सहकार्य केल्याच्या आरोपावरून एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे निलंबन होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना मानली जाते. कोटुरवार यांच्या जागेवर भरारी पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी केशव पुंजाळ यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला, मात्र या कारवाईने वन विभागात खळबळ उडाली. कोटुरवार यांच्या विभागीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले. सहायक वनसंरक्षक बिडवई या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. लवकरच ते आपला अहवाल देतील, असे सांगण्यात आले.