सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात सहा दिवसांत तीन जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचे वनविभागाचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. गेल्या काही दिवसांत बिबट्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्यामुळे वनविभागाने या नरभक्षक बिबट्याला एकतर जिवंत पकडण्याचे किंवा ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठीच सोमवारी चिखलठाण परिसरातील पाच एकर उसाचा फड पेटवून देण्यात आला.

इतकच नव्हे तर बिबट्या पळून जाऊ नये यासाठी शेताच्या चारही बाजूंना शार्पशूटर तैनात करण्यात आले. पण इतकी जय्यत तयारी केल्यानंतरही उस पेटवून देताच बिबट्याने शेजारी असलेल्या केळीच्या झाडांमधून शेजारील गावाच्या दिशेने पळ काढला. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजल्याच्या दरम्यान बिबट्याने उसतोड कामगाराच्या मुलीवर हल्ला केला, ज्यात तिचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचं वास्तव्य हे उजनी पट्ट्यात होतं. या भागात उस आणि केळीचं मोठ्या प्रमाणात पिक घेतलं जातं, ज्यामुळे गर्द झाडीत लपलेल्या बिबट्याचा शोध घेणं सोपं राहत नाही. सोमवारी, चिखलठाण येथील उसाच्या शेतात बिबट्या लपून बसल्याची माहिती मिळतात वनविभागाने त्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. परंतू बिबट्याने या सर्वांना चकवा देत पळ काढल्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला.