मुंबई महामार्गाजवळील साजापूर शिवारात शुक्रवारी रात्री उशिरा दरोडय़ाचा डाव पोलिसांनी उधळून लावला. गस्तीवरील पोलिसांनी इनोव्हा कारसह गावठी पिस्तूल, तलवार, कुकरी, नायलॉन दोरी, मोबाईल व रोख रक्कम असा सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल या वेळी जप्त केला. चौघा परप्रांतीय दरोडेखोरांना शिताफीने अटक करण्यात आली.
नईमोद्दीन जैनाद्दीन खान (वय ५३), त्याची मुले नौशाद (वय २६) व रिझवान (वय २०, दिलेरगंज, कालाकुंडा, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश), तसेच खुर्शीद आलम अब्दुल हमीद (वय २६, मिंडारा, जिल्हा अलाहाबाद, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल (कट्टा), लोखंडी धारदार कुकरी, तलवार, नायलॉन दोरी, मोबाईल व इनोव्हा कार असा ६ लाख २३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. साजापूर ते मुंबई महामार्ग रस्त्यावर सोनेरी रंगाच्या इनोव्हा कारमधून काही संशयित लूटमार व दरोडय़ाच्या इराद्याने धारदार शस्त्रांनिशी एकत्र फिरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक उन्मेष थिटे यांनी सहायक पोलीस आयुक्त अविनाश आघाव यांना ही माहिती कळविली. थिटे यांच्या पथकाने जुना नगरनाका ते वाळूज रस्त्याने एएस क्लबजवळून मुंबई महामार्गाला वळण घेऊन साजापूरकडे जाणाऱ्या रस्त्याने या कारचा शोध घेतला. या वेळी मुंबई महामार्ग चौकापासून साजापूरकडे अर्धा किलोमीटर अंतरावर जीपच्या दिव्यांच्या उजेडात ही कार व आतमध्ये संशयित लोक मिळून आले. कारसह दरोडेखोर पळून जाण्याच्या तयारीत असताना सावध पोलिसांनी छापा टाकून चौघांना शिताफीने पकडले. या वेळी त्यांचा एक साथीदार पळून गेला.