पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर टाकलेल्या दरोडा प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आणखी चार जणांना जेरबंद केले. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चौघांकडून तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्स या दुकानावर पाच ते सहा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला होता. या दरोडय़ात ८० लाख रुपये किमतीचे दागिने व ९ लाख रुपयांची रोकड पळवून नेण्यात आली होती.  या घटनेतील एका आरोपीला स्थानिकांनी पकडले होते. मात्र उर्वरित आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते. तेव्हापासून पोलीस या सर्वाच्या मागावर होते. या प्रकरणात यापूर्वी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील चौघांवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. स्थानिकांच्या मदतीनेच आता हा दरोडा टाकण्यात आला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.  तामिळनाडूतील तीन जणांचा या दरोडय़ात समावेश असल्याची बाबही समोर आली असून यातील दोन जण अद्यापही फरार आहेत. नव्याने अटक झालेल्या आरोपींमध्ये बिलाल कासीम कुरेशी, राहणार कुर्ला, मुंबई, प्रदीप ऊर्फ बबलू लक्ष्मण पाटील, राहणार श्रीगाव, समीर भगवान पाटील, राहणार श्रीगाव आणि सनी ऊर्फ चतन्य सुनील पाटील, राहणार श्रीगाव या चौघांचा समावेश आहे. या सर्वाना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने चौघांनाही ७ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हानकोटी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.