प्रबोध देशपांडे

गेल्या साडेसहा वर्षांत राज्यात कृषीपंपाची वीज देयक थकबाकी चौपटीहून अधिक वाढली असून वसुलीचे कुठलेही ठोस धोरण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय हस्तक्षेप हे कृषीपंप थकबाकी वसुलीपुढील आव्हान आहे.

करोना काळातील वीज देयकावरील सवलतीच्या मुद्दय़ावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे, तर दुसरीकडे वाढीव थकबाकीमुळे महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. महावितरणच्या सर्व प्रकारच्या ग्राहकांकडे एकूण ५९ हजार कोटींची थकबाकी आहे. यामध्ये कृषीपंपांची थकीत रक्कम ४२ हजार कोटींवर आहे. ही रक्कम ७१ टक्के असून, घरगुती ग्राहकांचाही त्यात ८ टक्के वाटा आहे.

सध्या करोना काळातील वीज देयकातील सवलतीच्या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. ऊर्जामंत्र्यांनी वीज देयकात सवलतीला नकार दिल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले. मात्र, महावितरणच्या एकूण थकबाकीचा विचार केल्यास त्यामध्ये लघुदाब कृषीपंपांची ७१ टक्के थकीत रक्कम आहे. दरवर्षी सरासरी ८ हजार कोटींनी कृषीपंपाच्या थकबाकीचा डोंगर वाढतो. सध्या लघुदाब कृषीपंपांची ४२,१०७ कोटी रुपये थकबाकी आहे. मार्च २०१४ मध्ये कृषीपंपांच्या थकबाकीची रक्कम १०,०४४ कोटी होती. गेल्या साडेसहा वर्षांमध्ये त्यामध्ये ३२,०६३ कोटीने वाढ झाली. घरगुती ग्राहकांकडे सध्या ४,८२४ कोटी रुपये थकीत आहेत. मार्च २०१४ मध्ये ८०६.७ कोटी थकीत होते. गेल्या साडेसहा वर्षांत त्यामध्ये सहा पटीने वाढ झाली आहे. मार्च ते ऑक्टोबर २०२० या करोना काळात घरगुती ग्राहकांची थकबाकी सर्वाधिक वाढल्याचे दिसून येते.

ऑक्टोबर २०१४ ते ऑक्टोबर २०१९ या पाच वर्षांच्या काळात राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती. या काळात कृषीपंपांच्या थकबाकी रक्कमेत मोठी वाढ झाल्याचे दिसते. त्या अगोदरच्या आघाडी किंवा आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही कृषीपंपांच्या थकबाकीचा आकडा चांगलाच वाढला आहे.

असे का घडते?

गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्याला आस्मानी-सुलतानी संकटांशी सामना करावा लागत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून कृषीपंपाचे देयक भरण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यात सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे महावितरणसाठी कृषीपंपाची थकबाकी ‘अवघड जागेचे दुखणे’ झाले आहे. थकबाकी वाढत असताना दुसरीकडे कृषीपंपाच्या नवीन वीज जोडण्या देण्यासाठी सरकारचा दबाव असतो. परिणामी, राज्यात वीज जोडण्यांत वाढ होण्याबरोबरच थकबाकीचा आकडाही फुगला आहे.

उच्चदाब कृषीचे १६६ कोटी थकीत

उच्चदाब कृषी ग्राहकांकडे १६६ कोटी रुपये थकीत आहेत. मार्च २०१४ मध्ये ४६ कोटी रुपये थकीत होते. साडेसहा वर्षांत त्यामध्ये १२० कोटींची भर पडली आहे.