गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयाचे ऑनलाइन शैक्षणिक ऑडिट शुक्रवारी झालेल्या प्राचार्य व विभाग प्रमुखांच्या ऑनलाइन बैठकीत केले गेले. दरम्यान प्राचार्यांना विश्वासात न घेताच जिल्हा प्रशासनाने अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविडच्या सेवेत गुंतवल्याने तसेच महाविद्यालय संस्थात्मक विलगीकरणासाठी घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

करोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुखांची ऑनलाईन ‘वे बेक्र मीट अ‍ॅप’वर बैठक झाली. या बैठकीला कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, परिक्षा विभाग प्रमुख डॉ. अनिल चिताडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य तथा विभाग प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाने यावर्षीपासून सर्व महाविद्यालयांना श्रेणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शैक्षणिक अंकेक्षणाचे २० हजार रूपये फी घेवून आज ऑनलाईन ऑडिट केले गेले. यात सर्व महाविद्यालयांना करोनाच्या टाळेबंदीमुळे एक वर्षासाठी संलग्नीकरण दिले गेले. यावेळी महाविद्यालय १५ जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला असला तरी ४ जूनच्या राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार प्राचार्यांनी निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले.

तसेच कुठल्याही प्रकारे या काळात शैक्षणिक वर्ग सुरू होणार नाही, असे देखील सांगितले गेले. सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेश सुरू करावा असे निर्देश दिले गेले. यावर नक्षलवादग्रस्त अतिदुर्गम भागातील महाविद्यालयांना ऑनलाईन प्रवेशात अडचणी जातील, त्यांना बँकेची गेट वे सुविधा उपलब्ध होणार नाही ही अडचण अहेरीचे प्राचार्य काटकर यांनी निदर्शनास आणून दिली. या बैठकीत अनेक महाविद्यालय संस्थात्मक विलगीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने प्राचार्य तथा संस्थांना विश्वासात न घेता परस्पर घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच बहुसंख्य महाविद्यालयांचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी कोविडच्या कामात गुंतवले गेले आहेत. त्यामुळे प्रात्याक्षिक परीक्षा किंवा मुख्य परीक्षा घेण्याची वेळ आली तर काय करायचे असाही प्रश्न उपस्थित झाला.

तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मची निर्मिती, अध्यापनशास्त्र मार्गदर्शक तत्वे, आकर्षित व रंजक शैक्षणिक व्हिडीओ, स्वतंत्र व तत्सम प्लॅटफॉर्मवरील शैक्षणिक साहित्य सद्यास्थितीत अभ्यासक्रमांशी मॅपिंग करणे त्यांचा विद्यार्थ्यांना क्रेडिटसाठी लाभ करून देणे या व इतर बाबी संबंधाने चर्चा करून आराखडा तयार करणे तसेच आचार्य पदवीकरीता ऑनलाईन मौखिक परीक्षा घेणे, विद्यापीठ व महाविद्यालयामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविणे, संलग्निकरण इत्यादी अशा व विद्यार्थ्यांच्याहिताच्या दृष्टीने अन्य लाभदायक बाबी तसेच शैक्षणिक सन २०२०-२१ ची शैक्षणिक योजना आदींबाबतही यावेळी चर्चा झाली.