वसईच्या किल्ल्यातील ऐतिहासिक संत गोन्सालो गार्सिया चर्चची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. चर्चचे दरवाजे आणि खिडक्या अहोरात्र सताड उघडय़ाअसल्यामुळे भटक्या श्वानांनी या चर्चला आपले विश्रांतीचे ठिकाण बनवले असून पक्ष्यांच्या विष्ठेने चर्चच्या आतील भाग आणि भिंती बरबटल्याचे दृष्टीस पडते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ऐतिहासिक वसई किल्ल्याला रोज असंख्य पर्यटक भेट देतात. त्यामुळे या किल्ल्याचे आणि त्यातील ऐतिहासिक वास्तूंचे पुरातत्त्वीय महत्त्व जाणून जतन व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. वसई किल्ल्यातील अन्य वास्तूंप्रमाणेच संत गोन्सालो गार्सिया या चर्चच्या भिंतींना संवर्धनाच्या नावाखाली केवळ जुजबी लेपन करण्यात आले असून त्याच्या ऐतिहासिक खुणा पुसल्या जात आहेत. या चर्चकडे पुरातत्त्व विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

या चर्चला पश्चिम आणि उत्तर बाजूने दरवाजे आहेत. हे दरवाजे कायम खुले असतात. त्यामुळे भटके श्वान चर्चमध्ये शिरून विश्रांती घेताना दिसतात. काही वेळा श्वानांच्या घाणीने चर्चच्या परिसरात दरुगधी पसरते. याशिवाय कुबतरे, कावळे आणि अन्य पक्ष्यांनीही घाण करून चर्चच्या आतील परिसर बरबटून टाकला आहे. तसेच, चर्चच्या भिंतीही पावसाच्या पाण्यामुळे खराब झाल्या असून भिंतींवर शेवाळ उगवल्याचे दिसून येते.

यासंदर्भात वसई किल्ल्यातील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता येथील दोन्ही कार्यालये बंद होती.

उत्सवालाच स्वच्छता

किल्ल्यातील संत गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये किल्लाबंदर तथा पाचूबंदर भागातील स्थानिक कॅथॉलिक मच्छीमार दर वर्षी जानेवारी महिन्यात संत गोन्सालो गार्सियाचा सण साजरा करतात. त्या वेळी हे चर्च आणि चर्चच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो. मात्र, सणानंतर पुरातत्त्व विभागाकडून वर्षभर हे चर्च दुर्लक्षित असते, असे स्थानिक मच्छीमारांकडून सांगण्यात आले.

वसईचा किल्ला समस्त दुर्गप्रेमींचे आकर्षण आहे. केवळ देशीच नव्हे तर विदेशी पर्यटकही या किल्ल्याला भेट देतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने येथील ऐतिहासिक वास्तूंचे पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून जतन करणे आवश्यक आहे.

– विशाल पाटील, स्थानिक कार्यकर्ता