पिंपळगाव खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील एका गोदामात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिलेटिनचा शक्तिशाली स्फोट झाला. ही घटना गुरूवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास हा घडली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरापर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस तपास करत आहेत.
पिंपळगाव परिसरात दगडखाणीसाठी जिलेटिनचा वापर केला जातो. पिंपळगाव येथील मुस्तफा मोहम्मद यांच्या गोदामात जिलेटिनचा साठा करण्यात आला होता. गुरूवारी रात्री २.३०च्या सुमारास अचानक या गोदामात ठेवलेल्या जिलेटिनचा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज सुमारे १० ते १२ किलोमीटरपर्यंत ऐकू आला. स्फोटाच्या आवाजाने घाबरलेल्या नागरिकांना प्रथम भूकंप असल्याचे वाटले. मात्र हा जिलेटिनचा स्फोट झाल्याचे निष्पन्न झाले. स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिलेटिनचा हा साठा कायदेशीर होता काय याचा तपास केला जात आहे. तसेच स्फोटाचे कारण ही अद्याप समजलेले नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत. सुदैवाने स्फोटात जीवितहानी झालेली नाही.
काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील नायगव्हाण येथे विहीर खोदण्यासाठी लावलेल्या जिलेटिनचा अचानक स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार होते.