25 February 2021

News Flash

जॉर्ज फर्नांडिस: कोकण रेल्वेचा खरा निर्माता

फर्नांडिस आणि मधू दंडवते यांच्या प्रयत्नांमुळे कोकण रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले

कोकण रेल्वे

देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामगार नेते, मुंबईच्या जनजीवनाशी जोडले गेलेले एकेकाळचे ‘बंदसम्राट’ अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती राजनाथ कोविंद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर अन्य राजकीय नेत्यांनी ट्विटवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘कोकण रेल्वेचे निर्माता’ असं म्हटलं आहे.

जॉर्ज फर्नांडिस हे १९८९ ते १९९० दरम्यान रेल्वे मंत्री होते. त्यावेळी ते खंबीरपणे कोकण रेल्वे झालीच पाहिजे या मताशी ठाम राहिल्यानेच. कोकण रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली. याचबद्दल आपल्या ट्विटमध्ये सुरेश प्रभू म्हणतात, ‘ते खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेचे निर्माते होते. ते रेल्वे मंत्री असताना अनेक मंत्रालयांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला विरोध केला. विरोध करणाऱ्यामध्ये अर्थमंत्रालयाबरोबरच तसेच इतर मंत्रालयांचाही समावेश होता. मात्र फर्नांडिस यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता हा प्रकल्प एकहाती पूर्ण केला. त्यांनीच श्रीधरन यांची नियुक्ती करत कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी वेगळ्या महामंडळाची निर्मिती केली. त्यामाध्यमातून प्रकल्प पूर्ण केला. लोकांच्या बैठकी घेऊन त्यांनी या प्रकल्पाचे महत्व पटवून दिले.’

कोकण रेल्वेचा इतिहास

> १ मे १९९८ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेय यांनी ७६० किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वेचे मार्गाचे उद्घाटन केले. (हा रेल्वे मार्ग २६ जानेवारी १९९८ पासून कार्यरत असला तरी त्याचे लोकार्पण हे १ मे रोजी झाले.)

> कोकण रेल्वेच्या प्रकल्पासाठी एकूण ३ हजार ४०० कोटी रुपये खर्च झाले.

> भारताचा उत्तर भाग आणि पश्चिम भाग दक्षिण भारताला जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरला

> आशियामधील सर्वात लांब पल्ल्याचा रेल्वे मार्गाचा टप्पा एकाच वेळी बांधण्याची ही पहिलीच वेळ होती

> फर्नांडिस यांनी रेल्वे मंत्री असताना वेगळ्या महामंडळाची स्थापना केल्यानंतर अवघ्या दहा वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.

> एकूण ७६० किलोमीटरपैकी ३८२ किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात, १०५ किलोमीटर गोव्यात तर २७३ किलोमीटरचा टप्पा कर्नाटकमध्ये आहे.

> या रेल्वे मार्गावर १६९ मोठे तर १६७० लहान पूल आहेत. तर एकूण बोगद्यांची संख्या ८८ इतकी आहे.

> विशेष म्हणजे काँग्रेस सत्तेत नसताना कोकण रेल्वेच्या प्रकल्पाला हिरावा कंदील मिळाला. या रेल्वे मार्गाचे लोकार्पणही भाजपाच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले आहे.

> हा रेल्वे मार्ग बांधून होण्याआधी मुंबईमधील नागरिकांनी अनेकदा गोवा तसेच कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे मार्ग असावा अशी मागणी केली होती. पण डोंगराळ भागातून रेल्वे मार्ग टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा लागणार असल्याने प्रकल्प लांबवणीवर पडत होता.

> १९७७ साली जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले. त्यावेळीचे रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेची संकल्पना पहिल्यांदा मांडली. त्यानुसार आपटा ते रोहा दरम्यान १५ किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बांधण्यातही आला. मात्र सरकार पडल्याने या प्रकल्प अर्धवटच राहिला.

> त्यानंतर पुन्हा व्ही. पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली १९८९ साली पुन्हा एकदा जनता दलाचे सरकार केंद्रात आल्यानंतर प्रकल्पाला पुन्हा उभारी मिळाली. यावेळी रेल्वेमंत्री म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांनी हा प्रकल्पाला हिरवा कंदील दिला तर अर्थमंत्री असणाऱ्या मधू दंडवते यांनी आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी होकार देत कोकण रेल्वेसाठी पैश्यांची तरतूद केली. फर्नांडिस हे स्वत: मुंबईचे असल्याने त्यांना हा रेल्वे मार्ग किती गरजेचे आहे याची कल्पना होती तर मधू दंडवते हे स्वत: कोकणातले असल्याने त्यांनाही या मार्गाचे महत्व ठाऊक होते.

> फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना केली. या मंडळाचे काम थेट रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत होते. त्यामुळे प्रकल्पाला वेग आला. यासाठी रेल्वे मंत्रालय, चारही राज्ये आणि परदेशातून कर्ज घेऊन निधी उपलब्ध करुन देण्यात आला. महामंडळाची स्थापना झाल्याने सरकार बदलले तरी या मार्गाचे काम कधी थांबले नाही आणि अवघ्या दहा वर्षात कोकण रेल्वे या मार्गावरुन धावू लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 11:12 am

Web Title: george fernandes was the driving force behind the konkan railway
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 ‘अनुदान बळीराजाच्या पदरात पाडा, अन्यथा शेतकरी काय करेल याचा ‘दाखला’ गडकरींनी दिला आहे’
3 शौचालयांच्या रंगरंगोटीचे शिक्षकांना काम 
Just Now!
X