सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना माजी न्यायमूती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते शनिवारी प्रधान करण्यात आला. तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ‘झी २४ तास’चे संपादक डॉ. उदय निरगुडकर, लेखिका डॉ. विणा देव, पत्रकार नाना जोशी आणि उद्योजक दीपक घैसास आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
भटक्या विमुक्त जातीचे विशेषत: पारधी जमातीच्या पुनर्वसनासाठी घेतलेले परिश्रम, उपेक्षितांच्या समस्यांबाबत केलेली जनजागृती तसेच सामजिक समरसता मंचाच्या माध्यामातून केलेले प्रगोय आणि अव्याहत कार्याची दखल घेऊन प्रभुणे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राजकारणाने समाजजीवन झाकोळून गेले असताना ‘चतुरंग’चे कार्य व गिरीश प्रभुणे यांच्यासारख्या व्यक्ती आशेचे दीप असल्याचे प्रतिपादन चपळगावकर यांनी केले.

आजूबाजूला भटक्या आणि वंचित जाती जमाती राहत असून त्यांचेही आपल्या व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असायला हवे. बदलती शिक्षण व्यवस्था आणि नव्या युगामध्ये या जातीजमातींकडे असणारे ज्ञान, कला आणि कारागिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या जाती जमातींकडे असणारा ठेवा पूर्णपणे नष्ट होण्याआगोदर त्याचे जतन करणे गरजेचे आहे.
– गिरीश प्रभुणे