पिकांची ५० टक्क्य़ांपेक्षा कमी हानी झालेल्या शेतकऱ्यांनाही सरकारने मदत द्यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जालना जिल्हा शाखेने केली.
जिल्हा सचिव अण्णा सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना या बाबत निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्य़ात अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांची प्रचंड हानी झाली. गुरा-ढोरांची जीवितहानी, तसेच घरांची पडझड झाली. सरकारने पिकांच्या हानीसाठी ५० टक्क्य़ांची अट काढून घेऊन सरसकट आर्थिक मदत देण्याची गरज आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळात शेतकरी उद्ध्वस्त झाला. या वर्षीही अवकाळी पाऊस व गारपिटीने त्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत देताना ५० टक्क्य़ांच्या पीक नुकसानीची अट घालणे अन्यायकारक आहे. पिकांचे पंचनामे करताना पक्षपात करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज, तसेच वीजबिल माफ करावे. एक महिन्याचा रोजगार बुडाला असल्याने शेतमजूर व कारागिरांना आर्थिक मदत द्यावी. येत्या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, तसेच खतांचा विनामूल्य पुरवठा करावा. घरांच्या पडझडीबद्दल मदत द्यावी. कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, तर बागायती पिकांना हेक्टरी दोन लाख व फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख रुपये मदत द्यावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.