कृत्रिम पावसाच्या तयारीसाठी आवश्यक असलेला स्फोटक वापराचा परवाना तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांना दिल्या आहेत. पावसासाठी विमानातून रसायने फवारण्यासाठी सुमारे ८ हजार नळकांडय़ा येणार आहेत. आलेली रसायने सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली जात आहे. या प्रयोगासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आले.
कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी सी डोपलर रडार ही यंत्रणा विभागीय आयुक्त कार्यालय इमारतीवर बसविण्यात येणार असून, त्यासाठी नियंत्रण कक्ष आणि इतर तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागास या कक्षासाठी लागेल ती मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृत्रिम पावसाच्या या प्रयोगाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी म्हणजे २००५ मध्ये हा प्रयोग हाती घेण्यात आला होता. तेव्हा त्याची देखरेख सिंचन विभागकडे होती, असे पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी सांगितली. ते म्हणाले, की हवामान तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा प्रयोग करताना वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. पर्जन्यरोपण ही क्रिया तशी कमी कालावधीत करावी लागते. ढग दिसल्यानंतर काही मिनिटांतच हा प्रयोग करणे आवश्यक असतो. नव्या प्रयोगात तंत्रज्ञानात काही बदल केल्याचे सांगितले जात आहे. ते कोणते हे समजून घ्यावे लागतील. पाऊस पडल्यानंतर त्या मोजण्याच्या यंत्रणा आपल्याकडे नीट नाहीत. पाऊस व्यवस्थित मोजला जात नाही, तोपर्यंत या प्रयोगाचे यश मोजणे अवघड होणार आहे.
दरम्यान, फवारणी रसायनांच्या स्फोटक परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.