News Flash

पंजाबचे राज्यपाल चाकूरकर राजीनामा देणार?

केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येत असताना पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर आपला कार्यकाळ पूर्ण करणार की राजीनामा देणार, या चच्रेला लातुरात जोर चढला

| May 19, 2014 02:17 am

केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येत असताना पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर आपला कार्यकाळ पूर्ण करणार की राजीनामा देणार, या चच्रेला लातुरात जोर चढला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच लातूरच्या राजकीय वर्तुळात चाकूरकरांच्या राज्यपालपदावर चर्चा रंगवली जात आहे.
चाकूरकर हे काँग्रेसचे कट्टर नेते असले, तरी त्यांचे सर्वपक्षीयांत सौहार्दाचे संबंध आहेत. कोणतीही विचारसरणी असली तरी त्यांचा सर्वच विचारसरणीच्या नेतेमंडळींशी चांगला संवाद आहे. सर्वाना सोबत घेऊन जाणारे व सर्वाच्या विचाराचा आदर करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून चाकूरकरांची ओळख आहे. दहा वर्षांपूर्वी (२००४) लातूरला लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही केवळ गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंधामुळे चाकूरकरांना केंद्रात थेट गृहमंत्रिपद मिळाले. गृहमंत्रिपद सोडावे लागल्यानंतर चाकूरकरांचा विजनवास सुरू झाला, अशी चर्चा होत असतानाच त्यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. पंजाबात अकाली दल, भाजपचे सरकार सत्तेवर आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार केंद्रातील सत्तेवरून पायउतार झाले. ज्या गांधी घराण्याशी चाकूरकर एकनिष्ठ आहेत, त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढवली गेली व काँग्रेसचा दारुण पराभव झाला. चाकूरकर यांचे सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध असले, तरी ते तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ होत असताना ते राज्यपालपदाचा राजीनामा देतील, असे त्यांच्या समर्थकांतील एका गटाचे म्हणणे आहे, तर दुसरा गट चाकूरकर राज्यपालपदी राहतील. केंद्रातील सरकारने राजीनामा देण्यास दबाव आणला तर त्याची वाटही ते पाहणार नाहीत. मात्र, एखाद्या वेळेस भाजप सरकारमधील वरिष्ठांनी आपला कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली, तर ती अव्हेरण्याची पावले ते टाकणार नाहीत. केंद्रातील मंडळी त्यांच्याशी कसे वागतील त्यावरून ते आपले वागणे ठरवतील. आपल्या कपडय़ाला डाग लागणार नाही याची काळजी घेणारे चाकूरकर आपली प्रतिमा डागाळणार नाही याचीही पुरेपूर खबरदारी घेतील व अकारण पदाला चिकटून राहणार नाहीत, असेही काही जणांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 2:17 am

Web Title: give resigne to punjab governor shivraj patil chakurkar 2
Next Stories
1 मदन पाटील यांच्याकडून पालिकेत ठेकेदार, अधिकाऱ्यांची झाडाझडती
2 टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांना धमकी
3 बसप, महासंघ, आपसह २१जणांची अनामत जप्त
Just Now!
X