गोदड महाराज संवत्सरीचे भाकीत

देशात यंदा सर्वत्र जोरदार पाऊस पडणार असून धनधान्य बक्कळ होणार असून आगामी वर्ष हे आनंदी व जनतेला सुखी ठेवणारे जाणार आहे. राज्यामध्ये मान्सून यंदा वेळेवर म्हणजे ८ जूनला दाखल होणार आहे, असे भाकीत गोदड महाराज यांच्या बाडामध्ये (संवत्सरी ) वर्तवण्यात आले आहे.  मंदिराचे पुजारी काकडे यांनी पाऊस भरपूर आहे, असे सांगताच उपस्थित भाविकांचे चेहरे आनंदाने फु लले होते.

कर्जतचे ग्रामदैवत व थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांनी पीकपाणी, राजकीय व इतर सर्व बाबींवर ६० वर्षांची संवत्सरी लिहून ठेवलेली आहे. दरवर्षी म्हणजे चैत्र पाडव्याच्या दिवशी १२ वाजता क्रमाने येणाऱ्या एका पानाचे  वाचन करण्यात येते. हे सर्व लिखाण संस्कृत मध्ये करण्यात आले आहे. यामध्ये या वर्षी काय भाकीत (भविष्य) आहे, याची मोठी उत्सुकता असते. या वेळी पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी व महिला आणि पुरूष नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

रविवारी गोदड महाराज मंदिरात ह.भ.प पंढरीनाथ काकडे व ह.भ.प.अनिल काकडे यांनी या संवत्सरीचे वाचन केले.  त्यांनी पुढे सांगितले की, या वेळच्या संवत्सरीचे नाव विलंबी संवत्सरी आहे. याचा केतू हा स्वामी आहे.  यावर्षी पाऊस भरपूर पडेल. धनधान्याचे उत्पादन भरपूर राहील, याशिवाय जनता आनंदी राहील. यामध्ये देशातील पूर्व भागात कमी पाऊस पडून दुष्काळी परिस्थिती  राहील.  बाजारपेठेत पुढील वर्षी चैत्र, आषाढ आणि ज्येष्ठ या महिन्यात महागाई वाढेल, तर  भाद्रपद आणि आश्विनमध्ये स्वस्ताई राहील असे भविष्य आहे.  काकडे यांनी  सांगितले, की आज जे आपण येथे संवत्सरीचे वाचन करीत आहोत हे केवळ आपल्या तालुक्याचे नसून हे देशाचे भविष्य आहे.  मागील वर्षीच्या भविष्यामध्ये सर्वानी चांगला पाऊस असे सांगितले होते, त्याचा अर्थ या वेळी देखील पिके चांगली आहेत. सर्व नक्षत्रामध्ये पाउस आहे,  यामुळे पाऊस चांगला आहे.  हे भविष्य सांगतानाच काकडे यांनी या वर्षी पंचांगामध्ये दिलेली पाऊस पाणी आणि  पिके याबद्दल सांगितले की,  यंदा वाण्याच्या घरी पाऊस आहे.

चैत्र महिन्यामध्ये अवकाळी पाउस पडणार असला, तरी मृग नक्षत्रामध्ये मेंढा हे वाहन आहे, त्यामुळे पाऊस चांगला व वेळेवर  पडणार आहे.  यंदा मान्सून वेळेवर म्हणजे ८ जून रोजी येणार आहे.  खरीप हंगामात चांगला पाउस पडेल.  वैशाखामध्ये स्वस्ताई असणार आहे. आद्र्रा,पुष्य,आष्लेशा,मघा या नम्क्षत्रामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, त्यामुळे रब्बी पिके चांगली येतील.

काही महिने मोदींना त्रासाचे

राजकीय भाकितामध्ये देशाच्या राजाला म्हणजे पंतप्रधानांना पुढील काही महिने त्रासाचे जाणार आहेत. सध्या देशामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरून हे दिसून येते. याशिवाय देशातील दक्षिण व उत्तरेच्या प्रमुख राजकीय व्यक्तीसदेखील काही महिने त्रासदायक सांगण्यात आले आहेत. हे बाड वाचण्यापूर्वी मंदिराचे प्रमुख मानकरी मेघनाथ पाटील यांनी महादेव मंदिराजवळ धान्य पुरून ठेवलेले काढून पाहिले. तिथेदेखील पाऊस चांगला असल्याचे दिसून आले व नंतर वाजतगाजत त्यांना मंदिरामध्ये आणण्यात  आल्यावर बाडाचे वाचन सुरू करण्यात आले. या वेळीदेखील हे ऐकण्यासाठी मंदिर परिसरामध्ये प्रचंड गर्दी झालेली होती.