मराठवाडय़ातील उस्मानाबाद, जालना व औरंगाबादमध्ये ग्रामीण रुग्णालये, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार आता टँकरवर सुरू आहे. उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयाला रोज चार टँकरने पाणीपुरवठा होत आहे, तर उमरगा येथून ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाणी संपले, कशी उपाययोजना करू, अशी विचारणा प्रशासनाकडे केली. बीडमधील युसूफ वडगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने टँकरची मागणी केली आहे. एकूणच आरोग्य व्यवस्थेला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे.
औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयातही पाण्याचा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो. या वर्षी ही समस्या तीव्र स्वरूपात जाणवेल. जालना जिल्हय़ातील बदनापूर, टेंभुर्णी, अंबड व जाफ्राबाद येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये पाण्याची स्थिती बिकट असल्याचे अधिकारी सांगतात. नेर ग्रामीण रुग्णालयात तर पाण्याचा थेंबही नाही. पाण्यासाठी विंधन विहीर घेण्याचे ठरविले होते. पण प्रयत्न करूनही तेथे पाणी लागले नाही. वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना पिण्यापुरते पाणी कसेबसे आणले जाते. याचा परिणाम रुग्णसेवेवर झाला आहे. प्रत्येक जिल्हय़ात प्राथमिक आरोग्य केंद्रात विंधन विहिरी घेण्यात आलेल्या आहेत. पण दिवसागणिक भूगर्भातील पाणी संपत असल्याने कूपनलिका कोरडय़ा पडू लागल्या आहेत. औरंगाबाद जिल्हय़ातील वैजापूर व सिल्लोड येथे ग्रामीण रुग्णालयांमध्ये टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. आवश्यकता असते तेथे टँकरने पाणी घ्या, अशा तोंडी सूचना आहेत. तथापि, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमधील पाणीपुरवठय़ाची एकही आढावा बैठक अजून घेण्यात आली नाही. गेल्या वर्षी घाटी रुग्णालयात पाणीटंचाईमुळे काही शस्त्रक्रिया थांबवाव्या लागल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्तीनी स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. त्यामुळे औरंगाबाद, बीड व जालना येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाणीपुरवठय़ाची माहिती सहा महिन्यांपूर्वी संकलित करण्यात आली. त्यानंतर याचा आढावा झाला नाही. या महिन्यात अनेक ठिकाणच्या विंधन विहिरी कोरडय़ाठाक झाल्याने रुग्णसेवेवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जालन्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव म्हणाले, की जिल्हा रुग्णालयाला पाण्याची अडचण नाही. गेल्या वर्षी एक विहीर घेण्यात आली होती. तथापि, बदनापूर, टेंभुर्णी, अंबड, नेर, जाफ्राबाद येथील ग्रामीण रुग्णालयातील पाणीपुरवठय़ाची स्थिती असमाधानकारक या श्रेणीत मोडते.