मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी झाले. त्यांना प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यापेक्षा १४ हजारहून अधिक मते मिळाली. निवडणुकीदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्याने ही निवडणूक तशी रंगली नाही. मतदानातूनही तो निरुत्साह दिसून आला. पसंतीक्रमानुसार मंगळवारी झालेल्या मतमोजणीत चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. रात्री उशिरा त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवार बोराळकर यांचा अर्ज भरण्यासाठी नवी दिल्लीवरून आवर्जून येणारे गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना प्रचारयंत्रणा लावण्यास नंतर बरीच धावपळ करावी लागली. तुलनेने चव्हाण यांचा शैक्षणिक संस्थांच्या कारभारात मोठा वाटा असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांनाही कामाला लावले होते. त्यामुळे निवडणुकीतील यंत्रणा त्यांनी उभी केली होती, असे निकालानंतर स्पष्ट झाले.
पहिल्या फेरीअखेर चव्हाण यांना पहिल्या पसंतीची २५ हजार ५७४ मते, तर दुसऱ्या फेरीत २८ हजार २५५ मिळाली. दोन्ही फे ऱ्यांमध्ये ११ हजार १५७ मतांची आघाडी होती. तत्पूर्वी टपाली मतमोजणीत त्यांना ४९ मते मिळाली. दुसऱ्या फेरीअखेर अवैध मतांची संख्या मात्र ९ हजार ८२७ झाली. २०० मतदारांनी मताचा नकाराधिकार वापरला.
निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात होते. चव्हाण व बोराळकर या दोघांतच प्रमुख लढत झाली. बोराळकर यांना दुसऱ्या फेरीअखेर ४२ हजार ९२७, तर चव्हाण यांना ५४ हजार ७८ मते मिळाली. या दोघांशिवाय इतर उमेदवारांना फारशी मते मिळाली नाहीत.
सकाळी मतमोजणीसाठी आठही जिल्ह्य़ांतील ३००हून अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दुपारी अडीच्या सुमारास पहिली फेरी मोजण्यात आली. पहिल्या पसंतीक्रमातच मतदानाचा कोटा चव्हाण यांनी पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
सतीश चव्हाण विजयी
सतीश चव्हाण- ६८,७६५
शिरीष बोराळकर -५३,६४७
एकूण वैध- १,२९,०२१
अवैध- १२, ९६१
नकराधिकार- २६०
उमेदवार विजयी होण्याचे सूत्र- वैध मते भागिले दोन अधिक एक