News Flash

करोना रुग्णांसाठी कलिंगडातून गुटखा, पार्सलमधून दारू

रुग्णांच्या नातेवाईकांचा कोविड केअर सेंटरवर प्रताप

(संग्रहित छायाचित्र)

रुग्णांच्या नातेवाईकांचा कोविड केअर सेंटरवर प्रताप

यवतमाळ : करोना संसर्ग आणि दारू यासंदर्भातील गैरसमजामुळे करोनाबाधित, पण दारूचे व्यसन असलेले अनेक रुग्ण येणकेन प्रकारे दारू मिळवण्यासाठी धडपडत आहेत. यातूनच फळांचा रस असल्याचे सांगून दारूची आणि कलिंगडाच्या (टरबूज) आतून गुटख्याची (खर्रा) तस्करी करण्याचा प्रकार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कोविड केअर सेंटरवर निदर्शनास आला. करोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रताप केला. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

या करोनाबाधित शौकिनांनी तलब भागवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी चक्क खर्रा पार्सल पाठवण्याचा प्रयत्न केला. तर काही जणांनी रुग्णांना पार्सलमधून विदेशी दारू पुरवण्याचा प्रयत्न केला. रुग्णांना दारू पाठवताना कोणाला शंका येऊ नये, यासाठी फळाचे ज्यूस किंवा घरचे जेवण आहे, असे वाटावे या पद्धतीने अ‍ॅल्युमिनिअमचे रॅपर असलेल्या पॅकेटमधून हे पार्सल दिले. परंतु सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी पार्सल उघडून पाहिले असता त्यात दारू असल्याचे समोर आले.

करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर हे रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी ही अफलातून शक्कल लढवली होती. मात्र हा प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला आहे. या प्रकाराने कोविड केअर सेंटरवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची बाब पुढे आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:38 am

Web Title: gutkha from watermelon alcohol from parcels for corona patients zws 70
Next Stories
1 लोकसहभागातून प्राणवायू!
2 ‘मरकज’च्या धर्तीवर कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांचा शोध सुरू
3 रुग्णाला दवाखान्यातून हाकलले
Just Now!
X