गंगाखेड मतदारसंघातून रासपच्या वतीने निवडणूक लढवत असलेले उद्योजक रत्नाकर गुट्टे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. कोटय़धीश गुट्टे केवळ आठवी इयत्ता शिक्षित असले, तरी उद्योगाच्या जोरावर त्यांनी निर्माण केलेले साम्राज्य व संपत्तीचे आकडे कोटींच्या घरात आहेत.
गुट्टे यांच्याकडे ५६ कोटी १८ लाख ८६ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून पत्नी सुदामती यांच्याकडे ४४ कोटी ९० लाख १ हजार ६०४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पती-पत्नीकडील जंगम मालमत्तेचा आकडा १०० कोटींहून अधिक आहे. गुट्टे यांच्या स्थावर मालमत्तेचा आकडा १३ कोटी ६३ लाख ५० हजार रुपये असून, पत्नीच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता १० कोटी ६६ लाख रुपयांची आहे. एकूण मालमत्तेचे चालू बाजारमूल्य सध्या २४ कोटी २९ लाख ५० हजार रुपये आहे.
गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्ससह कुंदर गुड्स, शेअर्स गुट्टे इन्फ्रा. प्रा. लि., सीन इंडस्ट्रीज लि. एम.आय.डी.सी. बुट्टीबोरी नागपूर आदी कंपन्यांमध्ये शेअर्सद्वारे गुंतवणूक, बंधपत्रे, ऋणपत्रे यांचा आकडाही मोठा आहे. राष्ट्रीय बचत योजना, पोस्टातील बचती, विमापत्रे आदी गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात आहे. खुद्द गुट्टे यांच्या मालकीच्या ४५ लाखांच्या तीन मोटारी आहेत. गुट्टे यांच्याकडे एक लाख ७६ हजार ४०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. पत्नीकडे २ लाख ८५ हजार ६०० रुपयांचे दागिने आहेत. गुट्टे यांच्याकडील चल संपत्तीचे मूल्य ५६ कोटी १८ लाख ८६ हजार १३ रुपये असून, पत्नीच्या नावे असलेल्या चल संपत्तीचे मूल्य हे ४४ कोटी ९० लाख १ हजार ६०४ रुपये आहे.
दैठणा घाट, टोकवाडी (ता. परळी), मरगळवाडी, सुरळवाडी, बनिपपळा, सुप्पा, वागदेवाडी, अकोली (गंगाखेड) वडगाव, वैतागवाडी (सोनपेठ), खापरखेडा (जिल्हा िहगोली) आदी ठिकाणी गुट्टे यांची शेतजमीन आहे. नागपूर, मुंबई आदी ठिकाणी निवासी इमारत आहे. नागपूर येथील प्लॉटचे सध्याचे बाजारमूल्य ४ कोटींच्या घरात असून अन्य ठिकाणच्या फ्लॅटच्या किमतीही लाखोंच्या घरात आहेत. पती-पत्नीच्या नावे असलेल्या सर्व स्थावर मालमत्तेचे आजचे बाजारमूल्य २४ कोटी २९ लाख ५० हजार रुपये आहे. बँका वित्तीय संस्थांचे कर्ज, देय रकमा हा आकडाही मोठा आहे. गुट्टे यांच्या नावे तो १६ कोटी ३२ लाख ८२ हजार ७४६, तर पत्नीच्या नावे ११ कोटी ५९ लाख ८७ हजार ५२५ रुपये आहे. दोघांकडील एकूण देणी २७ कोटी ९२ लाख ७० हजार २७१ रुपये आहे.