मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचे थैमान सुरूच आहे. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्य़ांतील काही भागांना शनिवारी सलग सहाव्या दिवशी पाऊस आणि गारांनी झोडपून काढले. विदर्भात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्य़ाला, तर मराठवाडय़ातील जवळजवळ सर्वच जिल्ह्य़ांना या अस्मानी संकटाचा सामना करावा लागला.
गारपीटग्रस्तांना मानसिक आधार गरजेचा
गारपिटग्रस्तांना भरपाई देणार-पवार
पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्याला, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगावलाही शनिवारी गारपिटीने तडाखा दिला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ठिकठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारांमुळे किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा चिखल झाला. मराठवाडय़ातील परळीमध्ये अवकाळी पावसाने शनिवारी दोघांचा बळी घेतला, तर तालुक्यात २२ जण जखमी झाले.
गारपिटीचा साडे सात हजार शेतकऱ्यांना फटका
परभणीत गारपिटीची आज शरद पवार पाहणी करणार
दरम्यान, आचारसंहिता असली तरी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी पाठवून द्यावा, आपण शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी पंढरपूर येथे दिले.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात दुपारी दोनच्या सुमारास वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. वादळी पावसाने कांदा, गहू, कपाशी व उन्हाळी मक्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. लासलगावसह परिसरात १५ ते २० मिनिटे गारपीट झाली. मालेगाव तालुक्यासह ताहाराबाद, पिंपळनेर भागास दीड ते दोन तास पावसाने जोरदार तडाखा दिला. अवकाळी पावसात ११ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यात सध्या दररोज सातत्याने भर पडत असल्याने नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
शेतक-यांच्या व्यथांनी पालकमंत्री हेलावले
शेतक-यांना जास्तीत जास्त मदत देऊ- थोरात
मराठवाडा
मराठवाडय़ात गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या वादळी पाऊस व गारपिटीने शनिवारी अधिक रौद्र रूप धारण केले. परळीत वीज पडून एकाचा, तर झाड कोसळून ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापूर, वैजापूर आदी तालुक्यांतही शनिवारी दुपारनंतर जोरदार गारपीट झाली.  परभणी जिल्ह्य़ात अवकाळी पावसाने शनिवारीही हाहाकार उडवला. लातूर शहर परिसर, तसेच अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. नांदेडमध्ये अनेक भागात शनिवारी बेमोसमी पावसाची नोंद झाली.
विदर्भ
अकोला जिल्ह्य़ातील अकोट, देवरी, हिवरखेड व तेल्हारा तालुक्यासह दानापूरलाही शनिवारी मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली.अकोला शहरात सकाळी तुरळक पाऊस झाला. तेल्हारा भागात जवळपास ५ मिनिटे गारपीट झाली. दानापूर येथे सुमारे १५ मिनिटे भयंकर गारपीट झाली आहे. तेल्हारा व दानापूर भागात गहू आणि आणखी पाऊस झाल्यास हरबराही हातचा जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.