होय, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे जरा चुकलेच. त्याने अलिबागमध्ये शेकाप आमदार जयंत पाटील यांची परवानगी न घेता थळ येथील समुद्र किनारी घर- जागा घेतली, तिथे त्याने आलिशान बंगलाही बांधला. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पार्टीही केली. या निमित्ताने बॉलिवूडचे तमाम सितारे अलिबागमध्ये बोलावले. त्याच्या अलिबागमधील बर्थडे सेलिब्रेशनची चर्चा गल्ली पासून दिल्ली पर्यंत झाली, त्यानिमित्ताने अलिबाग हे नाव त्याच्या करोडो फॅन्सपर्यंत पोहोचले. हे सर्व करताना त्याने एक चुक केली.. त्याने स्थानिक आमदार जयंत पाटील यांची परवानगी घेतली नाही. यामुळे आमदार पाटलांचा पारा चढला आणि त्यांनी थेट शाहरुखलाच मला विचारल्याशिवाय अलिबागमध्ये कोणी पाऊल ठेऊ शकत नाही अशी धमकी देऊन टाकली.

बॉलिवूडचा किंग खान आणि शेकाप आमदार जयंत पाटील यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शेकाप आमदार जयंत पाटील शाहरुख आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांना अलिबाग विकत घेतलंस का आणि मला विचारल्याशिवाय कोणी अलिबागमध्ये पाऊल ठेऊ शकत नाही असे वक्तव्य करताना दिसत आहेत. शाहरुख आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी आमदार पाटील यांच्या या धमकीला फारसे महत्व दिले नसले तरी ही क्लिप व्हायरल झाल्यामुळे त्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख गेली दोन वर्ष आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन अलिबाग येथील बंगल्यावर करतो. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी या बंगल्यावर मोठ्या पार्टीचे आयोजन केले जाते. बॉलिवूडचे तमाम स्टार्स या सेलिब्रशन पार्टीत सहभागी होतात. रात्रभर ही पार्टी सुरु राहते. सकाळी उठून शाहरूख ‘मन्नत’ बंगल्या बाहेर ताटकळत असणाऱ्या फॅन्सच्या भेटीसाठी मुंबईत परत जातो. तिथे मिडीयाच्या प्रतिनिधींसमोर केक कापून तो आपला वाढदिवस साजरा करतो. यावर्षीही शाहरुखने अशाच पध्दतीने आपला वाढदिवस साजरा केला. अलिबाग येथील सेलिब्रेशन आटपून तो सकाळी मांडवा मार्गे बोटीने मुंबईत निघाला. त्याची स्पीड बोट गेट वे ऑफ इंडिया येथे लागली. ही बातमी तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांना समजली. त्यांनी बोटी लागतात त्या परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शाहरुखच्या सुरक्षा रक्षकांनी चाहत्यांना ठराविक अंतरावर रोखण्याचा प्रयत्न केला. तो बोटीतून बाहेर पडेपर्यंत कोणी खाली बोटी लागतात त्या धक्क्यावर जाऊ नये, अशी विनंती उपस्थितांना केली जात होती. याच वेळी आमदार जयंत पाटील तिथे पोहोचले. त्यांना अलिबागला जायचे होते. त्यामुळे त्यांची खासगी बोट त्यांना घेण्यासाठी जेट्टीजवळ येत होती. नेमकी शाहरुखची बोटही तिथेच लागली होती. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना जयंत पाटील कोण आहेत हे माहित नसल्याने त्यांना हटकले. यामुळे त्यांचा संतापाचा पारा चढला. त्यांनी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना सुनावण्यास सुरुवात केली.

त्यांचा रुद्रावतार पाहून सुरक्षा रक्षकांनी त्यांना खाली जाण्यास परवानगी दिली. आमदार पाटील खाली उतरले. त्यांची स्पीड बोट शाहरुख बसलेल्या बोटीशेजारी लागली. या बोटीत बसताना त्यांनी अलिबागला विकत घेतलेस काय, माझ्या परवानगी शिवाय अलिबाग मध्ये कोणी येऊ शकत नाही अशी धमकी बॉलिवूडच्या किंग खानला देऊन टाकली. पाटील यांची बोट निघून गेल्यावर शाहरुख बोटीच्या बाहेर आला आणि चाहत्यांना हात दाखवत गाडीत बसून निघून गेला. त्याने जयंत पाटील यांच्या धमकीकडे फारसे लक्ष्यही दिले नाही. हा सर्व प्रकार तिथे असणाऱ्या चाहत्यांच्या मोबाईल मध्ये शुट झाला आणि आता तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला.

भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला काही मुलभत हक्क प्राप्त झाले आहेत. त्यात संचार स्वातंत्र आणि वास्तव्य करण्याचा हक्क आहे. पण तरीही शाहरुखचे जरा चुकलंय. त्याने पुढल्यावेळी अलिबागला येताना आणि जाताना आमदार पाटील यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. म्हणजे अशा घटनांना त्याला सामोर जावे लागणार नाही.

हर्षद कशाळकर