औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील योगेश राठोड या कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर कारागृह अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलीस महासंचालकांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचंही समजतंय. पण जोपर्यंत कारगृह अधिक्षकांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृताच्या पत्नीने आणि नातलगांनी घेतली आहे. २४ तास उलटूनही योगेशच्या मृतदेहावर नातेवाईकांनी अद्याप अंत्यसंस्कार केलेले नाहीत. तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे.

शनिवारी रात्री उशीरा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला होता. पण योगेशचा मृत्यू कारागृहातील पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. जोपर्यंत योगेशच्या मृत्यू प्रकरणी कारागृह अधिक्षकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे, त्यामुळे कालपासूनच घाटी रुग्णालयात तणावाची परिस्तिथी आहे. पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.

हर्सूल कारागृहात पोलिसांनी योगेशला बेदम मारहाण केली या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 17 जानेवारी 2019 रोजी हर्सूल पोलिसांनी योगेशला 2015 च्या एका गुन्ह्याखाली अटक केली होती. शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी 2015 मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होता. त्यावेळीही त्याला अटक करण्यात आली होती. पण त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता, मात्र त्याच्या नावे वॉरंट निघालं होतं. वॉरंट निघुनही तो कोर्टात हजर राहत नव्हता, परिणामी 17 तारखेला त्याला पुन्हा अटक करुन पोलिसांनी त्याला कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडीत असताना शनिवारी रात्री उशीरा अचानक कारागृह पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

पण, योगेशच्या अंगावर मारहाणीच्या जखमा स्पष्ट दिसत होत्या, त्यांची हत्या करण्यात आली आहे. कारागृहातील पोलिसांनी योगेशला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप योगेशच्या पत्नीने केला आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा अशी मागणी पत्नीने केली आहे. तर, हर्सूल कारागृहाच्या अधीक्षकांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करा, मृताच्या कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर करा आणि मृताच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घ्या असा मागण्या मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात आल्या असून मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

दरम्यान, योगेश राठोडला हर्सूल कारागृहात मारहाण झाल्याचा दावा कारागृह अधीक्षक अनुपकुमार उमरे यांनी मीडियाशी बोलताना फेटाळून लावला. योगेश कारागृहात फीट येऊन खाली पडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.