जिल्हा सहकारी बँकेला शेतकऱ्यांना देण्यासाठी २५१ कोटी रुपये विमा कंपनीकडून प्राप्त झाले. मात्र, बँकेने हे पैसे शेतकऱ्यांना न देता स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:च्या नावावर एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकांमध्ये जमा केले. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून वंचित राहिले. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना चार दिवसांत द्या अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.
जिल्ह्यातील ७ लाख ३२ हजार शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामात पीकविम्यापोटी ३० कोटी ६० लाख रुपये विमा कंपन्यांकडे जमा केले होते. कंपनीने यापकी ६ लाख १७ हजार शेतकऱ्यांना १२ मे रोजी ३३६ कोटींचा पीकविमा मंजूर केल्याचे जाहीर केले. या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २० मे रोजी भेटून केली होती. त्यानंतर कंपनीने ११ जूनला बीड जिल्ह्यासाठी मंजूर रक्कम बीड जिल्हा बँकेसह इतर बँकांमध्ये जमा केली. जिल्हा बँकेला ११ जूनला २५१ कोटी ४० हजार रुपये प्राप्त झाले. मात्र, त्याचे वाटप न करता हे पसे स्वत:च्या नावावर आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकेत जमा केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पीकविमा मंजूर होण्यास आधीच विलंब झाला. जिल्हा बँकेला ही रक्कम प्राप्त होऊन जवळपास महिना होत आला, तरी बँकेने शेतकऱ्यांना त्याचे वाटप न करता ‘फिक्स’ करुन त्याचे व्याज स्वत:साठी वापरण्यास उद्योग सुरू केला. शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविम्याचा पसा त्यांना मिळणे आवश्यक असताना, बँक मात्र स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शेतकऱ्यांचे पसे चार दिवसांत त्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मुंडे यांनी दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2015 1:30 am