कोल्हापूर जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन थोडेफार विस्कळीत झाल्याचे दिसून आले. दुपारी साडेतीन वाजेनंतर पाऊस सुरू झाला.

सुरूवातीस सोसाट्याचा वारा आला, त्यानंतर काळे ढग दाटून आले व विजांच्या कडकडाटात दमदार पावसाला सुरूवात झाली. खरंतर अद्याप केरळमध्येही पाऊस दाखल झालेला नाही. वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 जून रोजी केरळमध्ये पाऊस दाखल होणार आहे. त्यानंतर तो गोवा, कोकण व पश्चिम घाटातील पर्वत रांगेमार्गे कोल्हापूरात दाखल होत असतो. मात्र, आज पावसाने अचानक दमदार हजेरी लावली.

या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली, झाडं उन्मळुन पडली तसेच अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडीत झाल्याने जनजीवन काहीकाळ विस्कळीत झाल्याचे दिसून आले.

तर, पेरणीची कामे झालेली असल्याने, पावसाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी मात्र या पावसामुळे सुखावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर शेतकरी पेरणीच्या कामांना सुरूवात करत असतो. आता जिल्ह्यातील सर्व पेरणीची कामे पार पडलेली असल्याने शेतकऱ्यांना पावसाचीच प्रतिक्षा होती.