मराठवाडय़ातील काही जिल्ह्यंसह राज्यात ठिकठिकाणी शनिवारी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने १३ जणांचा बळी घेतला. बीडमधील धारूर तालुक्यात पाच जणांचा तर माजलगाव, औरंगाबाद व परभणीतील पूर्णा तालुक्यात प्रत्येकी एकाचा बळी गेला. नगर जिल्ह्यत तिघांना तर रायगडमध्ये दोघांना जीव गमवावा लागला आहे.

बीडच्या धारूर तालुक्यातील चारदरी शिवारात झाडावर वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. चारदरी येथे घागरवाडा शिवाराच्या माळावर शंकर पंढरीनाथ मुंडे यांचे शेत आहे. या शेतात बाजरीचे पीक काढण्यासाठी पंधरा मजूर गेले होते. या वेळी प्रचंड कडकडाटाने आलेली वीज शेतात काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळली. त्यात आसाराम आघाव (वय ३०), उषा आघाव (वय २५), दीपाली घोळवे (वय २२), शिवशाला मुंडे (वय २७), वैशाली मुंडे या पाच जणांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्य़ातील पैठण तालुक्यात रामेश्वर दशरथ शेरे (वय ३१) या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर शिवारात वीज पडून मंगलाबाई रामराव चापके या महिलेचा मृत्यू झाला.

रायगडमध्ये पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाचा आश्रय घेतलेल्या दोन तरुणांचा वीज अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. दिलीप शंकर साळवी  आणि प्रफुल्ल उमेश कदम (रा . फौजी आंबावडे ता. महाड) अशी त्यांची नावे आहेत.

मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईमध्ये शुक्रवारप्रमाणेच शनिवारी संध्याकाळीही पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. सकाळपासून पडलेल्या कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.