काल सायंकाळी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करीत पडलेल्या परतीच्या पावसामध्ये तालुक्यातील कुंभवडे येथे वीज पडून बबन तांबे यांच्या गोठय़ातील चार जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. सायंकाळी ८-३० वा.च्या सुमारास पडलेल्या विजेच्या घटनेमध्ये आणखीन दोन जनावरे जखमी झाली आहेत. काल सायंकाळी तालुक्यात पडलेल्या जोरदार परतीच्या पावसामध्ये तालुक्यातील कुंभवडे येथे वीज पडल्याची घटना घडली. सायंकाळी ८-३०वा.च्या सुमारास पडलेल्या या विजेच्या घटनेचा फटका त्या ठिकाणी तांबे यांच्या गोठय़ामध्ये असलेल्या जनावरांना चांगलाच बसला. यामध्ये तीन बैल आणि एक गाय जागीच मृत्युमुखी पडली. तर गोठय़ामध्ये असलेल्या अन्य जनावरांपैकी एक गाय आणि दोन वासरे गंभीर जखमी झाली आहेत. वीज पडून तांबे यांच्या झालेल्या नुकसानीचा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून, त्यामध्ये त्यांचे सुमारे ७३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त केळवली येथील काशिराम शेंगाळे यांच्या घरावरील पत्रा उडून त्यांच्या घराचे सुमारे एक हजार रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे. वीज पडून जनावरे मृत्युमुखी पडलेल्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पंचायत समितीच्या सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी आज कुंभवडे येथे घटनास्थळी भेट दिली. तर यावेळी उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी डॉ. नम्रता नाकोड यांनी जखमी झालेल्या जनावरांवर औषधोपचार केले.