हनीट्रॅप प्रकरणात आणखी एक ‘चित्रफीत’; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर : जखणगाव (ता. नगर) परिसरातील हनीट्रॅप प्रकरणात आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून या टोळीतील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेत महिलेच्या शरीरसंबंधाचा अश्लील चित्रफीत बनवून तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली तसेच ८० हजार रुपये लुटण्यात आले आहेत. या घटनेतील तक्रारदार सरकारी सेवेतील वर्ग-१ दर्जाचा अधिकारी आहे. हा अधिकारी परिवहन सेवेशी संबंधित असल्याचे समजते. या हनीट्रॅप प्रकरणामागील सूत्रधार संबंधित महिलाच आहे की आणखी कोण? याचा तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.

धनिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्याला शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडायचे व त्याचा अश्लील चित्रफीत तयार करून पोलिसात बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन खंडणी मागायची. खंडणी मागण्यासाठी तरुणांची टोळी तयार करण्यात आली होती. ही टोळी फशी पडलेल्या धनिकाला ब्लॅकमेल करीत असे. तसेच मारहाण करून त्याच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम काढून घेत असे.

या हनीट्रॅपमधील संबंधित महिला नगर शहर जवळील, कल्याण रस्त्यावरील जखणगाव (ता. नगर) येथील रहिवासी आहे. तेथे तिचा बंगला व किराणा दुकान आहे. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी त्याच परिसरातील एका व्यावसायिकाने नगर तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याला अशाच पद्धतीने १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली तसेच त्याला बांधून ठेवून, मारहाण करून त्याच्याकडील ५ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज काढून घेण्यात आला होता.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तपास करत महिला व तिचा साथीदार अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटिक चौक, नगर) या दोघांना अटक केली. मोरे याचे कायनेटिक चौकात किराणा दुकान आहे. या महिलेचा मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला. या मोबाइलमध्ये आणखी एकाचा अशाच पद्धतीचा व्हिडिओ जतन केलेला होता. या आधारे पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करून त्याला तक्रार देण्यास राजी केले.

हा अधिकारीही कल्याण रस्त्यावरील एका गावात राहणारा आहे. त्यालाही महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढले व शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचा अश्लील व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या आधारे महिलेने या अधिकाऱ्याकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली तसेच अमोल मोरे, सचिन भीमराज खेसे (रा. हमीदपूर, नगर), महेश बागले व सागर खरमाळे (दोघेही रा. नालेगाव, नगर) या तिघांनी त्याला बांधून ठेवून मारहाण करून त्याच्या कारच्या डिकीत ठेवलेले रोख ८० हजार रुपये काढून घेतले तसेच त्याला धमकावून नातेवाइकांच्या नावावर ५० हजार रुपये ऑनलाईन वर्ग करण्यास भाग पाडले.

या अधिकाऱ्याने नगर तालुका पोलिसांकडे काल, सोमवारी तक्रार दाखल केली. त्याआधारे वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वीच्या प्रकरणात संबंधित महिला व अमोल मोरे या दोघांना अटक केली. या दोघांना दि. २० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आता या दुसऱ्या गुन्ह्यातील वरील महिला व मोरे याच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील सचिन खेसे याला अटक करण्यात आली आहे. सचिन खेसे हाही हमीदपूरमध्ये किराणा दुकान चालवतो. महेश बागले व सागर खरमाळे हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

व्याप्ती वाढली; सूत्रधार कोण?

नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. या हनीट्रॅप मागील मुख्य सूत्रधार कोण याचीही चर्चा सुरू आहे. सध्यातरी या प्रकरणात जखणगाव येथील महिला व तीने तयार केलेली टोळी आढळली आहे. मात्र महिलेकडून जप्त केलेल्या मोबाइलमध्ये आणखी एक ऑडिओ क्लिप पोलिसांना आढळल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे याबाबत तक्रार दाखल होणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. नगर तालुका पोलिसांकडे दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी असलेले महेश बागले व सागर खरमाळे हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात रस्ता लूट, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही टोळी केवळ संबंधित महिलेनेच तयार केली की, त्या पाठीमागे आणखी कोण सूत्रधार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.