करोनाच्या पार्श्वभूमीवर जूचंद्र येथील सर्वसामान्य रुग्णालयात पालिकेतर्फे सुरू करण्यात आलेला विलगीकरण कक्ष बंद करण्यात आला आहे. हा कक्ष बंद करून सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही हे रुग्णालय पूर्ववत करण्यात न आल्याने रुग्णांची गैरसोय  होऊ लागली आहे.

नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथे पालिकेतर्फे सर्वसामान्य नागरिकांच्या उपचारासाठी २० खाटांचे रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात विविध प्रकारच्या तपासणी व वैद्यकीय उपचारांसाठी नागरिक येत असतात. करोनाकाळात येथील सर्वसामान्य रुग्णालयात तात्पुरता स्वरूपात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला होता. तो कक्ष अवघ्या काही दिवसांतच पालिकेने बंद केला. परंतु कक्ष बंद केल्यानंतर पालिकेने तातडीने सर्वसामान्य नागरिकांच्या उपचारांसाठी असलेले रुग्णालय सुरू करणे गरजेचे होते. परंतु हे रुग्णालय सहा महिन्यांपासून सुरू न करण्यात आल्याने वैद्यकीय उपचारांसाठी नागरिकांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

रुग्णालय बंद असल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. परिणामी बहुतांश वेळा त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेची नाहक आर्थिक लूट केली जाते. सध्याच्या या संकटात काही नागरिकांना आर्थिक खर्च करणेही कठीण होऊन बसले आहे. यामुळे जूचंद्र येथील रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांचे उपचारासाठीचा एकमेव पर्याय आहे, परंतु हाच पर्याय बंद असल्याने रुग्ण जाणार कुठे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नायगाव पूर्वेतील विभागातील नागरीकरण झपाटय़ाने वाढत असून त्यामधील बहुतांशी लोकसंख्या मध्यमवर्गीय, नोकरदार, आदिवासी पाडे, मजूर वर्ग, रोजंदारीवर काम करणारी आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरजू नागरिकांना माफक किंवा मोफत दरातील उपचार उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी रुग्णालय तातडीने सुरू करा अशी मागणी होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी जूचंद्र येथील रुग्णालय हा एकमेव पर्याय आहे. पालिकेने ही बाब लक्षात घेऊन रुग्णालय सुरू करून नागरिकांची अडचण दूर करावी.

– कन्हैया भोईर, माजी सभापती, प्रभाग ‘जी’